मुंबई, पुढारी ऑनलाईन : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर वर्षभरापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या हिवाळी अधिवेशनात होणार आहे. ही निवडणूक आवाजी मतदानाने पार पडेल.
दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडीला, हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्यावे, असे आव्हान दिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा नियम समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्यात प्रस्ताव तयार केला आहे. २२ डिसेंबरला पार पडणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा हा प्रस्ताव मंजू करून लगेचच अध्यक्ष निवड केली जाणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या लांबलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियम समितीची ही बैठक पार पडली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घेतली जाते. भाजप ज्या पद्धतीने आव्हान देत आहे ते पाहता महाविकास आघाडी कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळे विधीमंडळ नियम समितीच्या बैठकीत नियम बदलण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलत तो आता आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या बैठकीत भाजप सदस्य डॉ संदीप धुर्वे, जयकुमार गोरे, धनंजय गाडगीळ यांनी नियम बदलाला तीव्र विरोध केला. उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. महाराष्ट्रातही अशी पद्धत असताना आता ती बदलून नये असे नमूद केले. कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जातोय, असा आरोपही केला.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. मात्र, ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेताना काही आमदार फुटण्याची भीती महाविकास आघाडीला वाटते. अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव हा प्रस्ताव संमत करायचा असेल तर सभागृहात बहुमताची गरज आहे. महाविकास आघाडीकडे २८८ पैकी १७० इतके संख्याबळ आहे. तर भाजपचे विधानसभेत १०६ सदस्य आहेत. मात्र, भाजप वारंवार महाविकास आघाडीला आव्हान देत आहे. गुप्त मतदान घेतल्यास महाविकास आघाडीचा फुगा फुटेल असे अनेक नेते म्हणत आहेत. गुप्त मतदानावेळी जर महाविकास आघाडीला संख्याबळापेक्षा कमी मतदान झाले तर विरोधक आक्रमक होऊन राजीनाम्याची मागणी करतील. त्यामुळे हा धोका पत्करण्याऐवजी आवाजी मतदानाने अध्यक्षनिवड केली जाणार आहे.
हेही वाचा :