शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मिळणार जातीचे दाखले | पुढारी

शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मिळणार जातीचे दाखले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांतच जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. याकरिता दि. 20 ते दि. 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम आयोजित करण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गतच अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमाती (एस.टी.), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) व इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या प्रवर्गांतील जातीचे दाखले देण्यात येणार आहेत.

एक लाख विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट निश्चित करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व महसूल विभागामार्फत या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत सध्या प्रवेश असलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दि. 20 ते 31 डिसेंबर या कालावधीत या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

विद्यार्थ्यांना जातीचे दाखले ( cast certificate ) प्राप्त होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संकुलप्रमुखांनी प्रयत्न करावेत. एकही मागासवर्गीय विद्यार्थी जातीचा दाखला मिळण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या आश्रमशाळा, समाजकार्य महाविद्यालय आदी शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, संबंधित तहसीलदार यांच्या मदतीने समन्वय साधला जाणार आहे. त्याद्वारे मागासवर्गीय सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले मिळण्यासाठीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे या विशेष मोहिमेत दाखल करून घेतले जातील, असेही लोंढे यांनी सांगितले.

Back to top button