पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींच्या तारखा आज (दि.९) जाहीर झाल्या. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर, मध्य प्रदेश १७ नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होईल. या पाचही राज्यांतील निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर होईल, अशी माहिती आज नवी दिल्ली येथील रंगभवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी दिली. निवडणूक आयुक्त (EC) अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल हेही यावेळी उपस्थित होते. (Assembly Elections 2023)
संबंधित बातम्या :
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "४० दिवसांत सर्व ५ राज्यांना आम्ही भेटी दिल्या आणि तेथील राजकीय पक्ष, केंद्र आणि राज्य अंमलबजावणी संस्थांशी चर्चा केली. मिझोराममध्ये एकूण ८.५२ लाख, छत्तीसगडमध्ये २.०३ कोटी, मध्य प्रदेशात ५.६ कोटी, राजस्थानमध्ये ५.२५ कोटी आणि तेलंगणामध्ये ३.१७ कोटी मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. या पाच राज्यांत १.७७ लाख मतदान केंद्र असतील. ५ राज्यांतील निवडणुकीत सुमारे ६० लाख मतदार (वय १८-१९ वर्षे) पहिल्यांदा सहभागी होतील. १५.३९ लाख तरुण मतदार निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत. तरुण मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी २९०० हून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तरुण पाहतील, असेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. १७,७३४ मॉडेल मतदान केंद्रे असतील. ६२१ मतदान केंद्राचे व्यवस्थापन पीडब्ल्यूडी कर्मचारी पाहतील आणि ८,१९२ मतदान केंद्रावरील व्यवस्थापन महिलांकडे असेल, असेही त्यांनी सांगितले.
पाच राज्यांतील ६७९ विधानसभा जागांसाठीच्या निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर झाले. ४० सदस्यीय मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे, तर ९० सदस्यांच्या छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीमध्ये संपणार आहे. २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेचा, २०० सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेचा आणि ११९ सदस्य असलेल्या तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळही जानेवारीतच संपत आहे. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग गेल्या दोन महिन्यांपासून या पाच राज्यांचा सातत्याने दौरा करत होते.
छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरामच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "PwD मतदारांची एकूण संख्या 17.34 लाख आहे. जर ते मतदान केंद्रावर येवून मतदान करू शकत नसतील तर त्यांना त्यांच्या घरूनही मतदान करण्याची सुविधा मिळेल."
मध्य प्रदेश- २३०
छत्तीसगड- ९०
राजस्थान- २००
तेलंगणा- ११९
मिझोराम- ४०
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर भाजप सत्ता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७१ जागा जिंकून राज्यात प्रथमच सरकार स्थापन केले. त्याचवेळी भाजपला केवळ १३ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय बसपने २ तर जनता काँग्रेसने ३ जागा जिंकल्या होत्या.
मध्य प्रदेशात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मध्य प्रदेशात गेल्या पाच वर्षांत दोन सरकारे आली आहेत. २०१८ च्या निवडणुकीच्या निकालानंतर १५ वर्षांनी राज्यात काँग्रेसने सरकार स्थापन केले. कमलनाथ राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, राज्यातील कमलनाथ सरकार केवळ १५ महिनेच टिकू शकले. १५ महिन्यांनंतर भाजप पुन्हा एकदा राज्यात सत्तेत आले.
२३० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला बहुमतापेक्षा दोन कमी म्हणजे ११४ जागा मिळाल्या होत्या. त्याचवेळी भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. बसपाला दोन तर इतरांना पाच जागा मिळाल्या होत्या. निकालानंतर काँग्रेसने बसपा, सपा आणि इतरांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. १५ वर्षांनंतर राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आणि कमलनाथ मुख्यमंत्री झाले. मात्र निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मोठे राजकीय नाट्य घडले. फ्लोअर टेस्टपूर्वी कमलनाथ यांनी राजीनामा दिला. २२ बंडखोरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर २३ मार्च २०२० रोजी शिवराज सिंह चौहान यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सध्या मध्य प्रदेशमध्ये भाजपचे १२७, काँग्रेसचे ९६ आमदार आहेत.
राजस्थानमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत फक्त काँग्रेस विरुद्ध भाजप असेच चित्र पाहायला मिळणार आहे. याशिवाय काही जागांवर बसपा आणि इतर पक्षांचा प्रभाव दिसून येतो. राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा आहेत. तिथे सध्या काँग्रेसचे सरकार असून अशोक गेहलोत मुख्यमंत्री आहेत. कोणताही पक्ष सलग दोनदा सत्तेवर येत नाही, ही राजस्थानची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहते की काँग्रेस पुन्हा सरकार बनवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Assembly Elections 2023)
तेलंगणात या निवडणूकीत तिरंगी लढत पाहायला मिळू शकते, बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी स्पर्धा आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या शेवटच्या निवडणुका २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसोबत होणार होत्या. पण TRS (आता BRS म्हणजेच भारत राष्ट्र समिती) सरकारच्या शिफारशीवरून विधानसभा बरखास्त करण्यात आली, ज्यामुळे मुदतपूर्व निवडणुका झाल्या. २०१८ मध्ये तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीने एकतर्फी विजय नोंदविला होता. केसीआरच्या नेतृत्वाखालील बीआरएसला ११९ सदस्यीय विधानसभेत ८८ जागा मिळाल्या होत्या. याशिवाय काँग्रेसने १९, आयएमआयएम सात, टीडीपी दोन आणि भाजप आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. निकालानंतर बीआरएसने राज्याच्या स्थापनेनंतर सलग दुसऱ्यांदा बहुमताने सरकार स्थापन केले आणि के. चंद्रशेखर राव राज्याचे मुख्यमंत्री झाले.
मिझोराम राज्यात २८ नोव्हेंबर २०१८ रोजी शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत MNF ने ४० सदस्यीय विधानसभेत २७ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने चार, तर भाजपने एक जागा जिंकली होती. याशिवाय आठ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. यासह, मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात MNF सरकार स्थापन झाले. सध्याच्या राजकीय समीकरण बघता विधानसभेत MNF चे २८, काँग्रेसचे ५, झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चा एक आणि भाजप एक आमदार आहेत. तर पाच जागांवर अपक्ष आमदार आहेत. या निवडणुकीत मुख्य लढत MNF, ZPM, काँग्रेस आणि भाजप यांच्यात होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात एमएनएफचे सरकार असून निवडणुकीत आपली सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे.
राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री झोरमथांगा आहेत. यावेळीही MNF केवळ चेहरा घेऊनच निवडणुकीत उतरणार आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी MNF ने सर्व जागांसाठी नावे जाहीर केली होती. झोरामथांगा आयझॉल पूर्व-१ मधून निवडणूक लढवणार आहेत. तर राज्यातील इतर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, भाजप आणि ZPM यांनी अद्याप कोणतीही यादी जाहीर केलेली नाही. यावेळी भाजप १५ ते २० जागांवर निवडणूक लढवणार आहे. राज्यात सत्तेत येण्यासाठी काँग्रेसही जोरदार प्रयत्न करत आहे. पक्षाने राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी पीपल्स कॉन्फरन्स (पीसी) आणि झोरम नॅशनलिस्ट पार्टी (झेडएनपी) या राज्यातील दोन स्थानिक पक्षांसह 'मिझोराम सेक्युलर अलायन्स' (एमएसए) ची स्थापना केली आहे. (Assembly Elections 2023)
हेही वाचा :