पुढारी ऑनलाईन डेस्क : एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरीसह पदकांची कमाई सुरूच आहे. दरम्यान, आज (दि.२८) पाचव्या दिवशी शीतल देवी हिने दमदार कामगिरी करत महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड ओपन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदा हिला चित्तथरारक सामन्यात पराभूत करत हे सुवर्णपदक पटकावले. (Asian Para Games)
पॅरा गेम्समध्ये याआधी शीतल देवीने सरिता सोबत महिला दुहेरी कंपाऊंड इव्हेंटमध्ये रौप्यपदक जिंकले होते. गुरुवारी (दि.२५) तिने मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हात अथवा पाय नसले तरी स्वप्नांना पंख असतात. टीम इंडियातील १६ वर्षीय तिरंदाज शीतल देवी ही जुलैमध्ये पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली हात नसलेली महिला बनली होती. तिने आता हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये तिच्या सहकाऱ्यासह महिला दुहेरी कंपाऊंडमध्ये रौप्यपदक जिंकले.
शीतल देवीने जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील लोई धार या दुर्गम गावातून पुढे येऊन जागतिक स्तरावर तिरंदाजीत नाव कमावले आहे. जम्मूमधील किश्तवाडमधील दुर्गम भागात 16 वर्षीय तरुणीने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. दृढनिश्चय आणि लवचिकतेच्या जोरावर भारतीय तिरंदाज शीतल देवी हीने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.