पुढारी ऑनलाईन : एशियन पॅरा गेम्समध्ये भारताला आणखी एक सुवर्ण मिळाले आहे. पुरुषांच्या ५ हजार मीटर टी ११ स्पर्धेत भारताच्या अंकूर धामा याने सुवर्णपदकाला गवसणी घातली. (Asian Para Games 2023) एशियन पॅरा गेम्समधील भारताचे हे पाचवे सुवर्णपदक आहे. चीनमधील हांगझोऊ येथे ही स्पर्धा सुरु आहे. २९ वर्षीय अंकूर धामा हा अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू आहे.
५ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह एकूण १२ पदकांसह भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर चीन अव्वल स्थानी आहे.
संबंधित बातम्या
एशियन पॅरा गेम्समध्ये ॲथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत तिन्ही पदके जिंकली. २९ वर्षीय प्रणव सूरमाने (३०.०१ मीटर) एशियन पॅरा गेम्सचा विक्रम मोडत सुवर्णपदक जिंकले. तर धरमबीर (२८.७६ मीटर) आणि अमित कुमार (२६.९३ मीटर) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. तसेच अवनी लेखरा हिने महिलांच्या R2 १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
तीन भारतीय खेळाडूंनी पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. पण आशियाई पॅरालिम्पिक समिती (APC) नियमांनुसार भारताला केवळ सुवर्ण आणि रौप्यपदक मिळाले. या स्पर्धेत केवळ तीन भारतीय स्पर्धक होते आणि APC च्या 'मायनस वन नियम' अंतर्गत शैलेश कुमारने विक्रमी १.८२ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले तर मरियप्पन थांगावेलूने रौप्यपदक मिळवले.
निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्ण जिंकून दिले. राम पालने कांस्यपदक मिळवले.