पुढारी ऑनलाईन डेस्क: चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत १११ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये २९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत चीनने ५२१ पदकं मिळवत पहिले स्थानी तर भारताने १११ पदकांची कमाई करत पाचवे स्थान पटकावले आहे. (Asian Para Games 2022)
जकार्ता येथे २०१८ साली झालेल्या आशियाई पॅरा गेम्स स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३३ कांस्य अशी एकूण ७२ पदके मिळवली होती; पण यंदा चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने पदकांचे शतक झळकावले. आज (दि.२८) आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या अंतिम दिवशी (दि.२८) भारताने एकूण १११ पदके आपल्या नावावर केली. चीनमधील हांगझोऊ येथे सोमवार (दि.२३) ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्सची आज सांगता झाली.
आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० पदके मिळवणे हा आनंदाचा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० पदके! हा एक अतुलनीय आनंदाचा क्षण. हे यश आमच्या खेळाडूंची निखळ प्रतिभा, मेहनत आणि दृढनिश्चयाचे फळ आहे. हा उल्लेखनीय मोलाचा क्षण आमचे हृदय अपार अभिमानाने भरून टाकणार आहे. मी आमचे अतुलनीय खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्यासोबत काम करणार्या संपूर्ण सपोर्ट सिस्टमचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो." असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.