पुढारी ऑनलाईन डेस्क : asian games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मंगळवारी तिसरे सुवर्णपदक जिंकले. घोडेस्वारी संघाने तब्बल 41 वर्षांनंतर या खेळात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. भारताकडून सुदीप्ती हाजेला, दिव्यकृती सिंग, हृदय छेडा आणि अनुष अग्रवाल या चौघांनी सुवर्ण कामगिरी मोलाचे योगदान दिले. यापूर्वी 1982 साली दिल्लीत खेळवण्यात आलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी या क्रीडा प्रकारात भारताने सुवर्णपदक पटकावले होते.
घोडेस्वारीच्या 40 वर्षांच्या इतिहासात भारताने प्रथमच एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ड्रेसेज स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे घोडेस्वार अनुष, सुदीप्ती, दिव्यकीर्ती आणि हृदय यांनी चमकदार कामगिरी केली. संघाने 209.205 गुण मिळवले. दिव्यकीर्तीला 68.176 गुण, हृदयला 69.941 गुण आणि अनुषला 71.088 गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा 4.5 गुणांनी पुढे होता.
घोडेस्वारी स्पर्धेत भारताने यजमान चीनला मात दिली. चीनी संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चीनला एकूण 204.882 गुण मिळाले. तर हाँगकाँगचा संघ 204.852 गुणांस तिसऱ्या क्रमांकावर राहिला. चायनीज-तैपेईचा संघ चौथ्या आणि यूएईचा संघ पाचव्या स्थानावर राहिला.
भारताला तिसऱ्या दिवशी तिसरे सुवर्णपदक मिळाले. सोमवारी (25 सप्टेंबर) भारताच्या महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले. तर नेमबाजीतही सुवर्णपदकांवर मोहोर उमटवली होती. आता टीम इंडियाच्या खात्याय एकूण 14 पदके आहेत. भारताच्या खात्यात 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदके जमा झाली आहेत.