Asia Cup IndvsNep : नेपाळचा संघ ऑलआऊट, भारतापुढे 231 धावांचे लक्ष्य

Asia Cup IndvsNep : नेपाळचा संघ ऑलआऊट, भारतापुढे 231 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन : Asia Cup IndvsNep : नेपाळने भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले आहे. या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला 48.2 षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला आणि 230 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी नेपाळकडून आसिफ शेखने 58 धावा आणि सोमपाल कामीने 48 धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी पाहता विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेपाळची चांगली सुरुवात

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेपाळविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेपाळच्या कुशल आणि आसिफ या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली.  दोघांनी पहिल्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. नेपाळच्या चांगल्या सुरुवातीमध्ये भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचाही हातभार लागला. भारताने पहिल्या 5 षटकातच 3 झेल सोडले. पण त्यानंतर कुशलचा (25 चेंडूत 38 धावा) अडसर शार्दुल ठाकूरने दूर केला आणि भारताला पहिले यश मिळवून दिले.

कुशल भुर्तेलच्या 1000 धावा पूर्ण

कुशल भुर्तेलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 1000 धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो नेपाळचा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या खात्यात आता 46 एकदिवसीय सामन्यांमध्ये 81.19 च्या स्ट्राइक रेटने 1,032 धावा जमा झाल्या आहेत. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 6 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे. भुर्तेलच्या आधी नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल आणि सलामीवीर आसिफ शेख यांनी वनडेत 1000 हून अधिक धावा केल्या आहेत.

नेपाळचा डाव गडगडला

चांगल्या सुरुवातीनंतर नेपाळने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. भीम शार्की (7), कर्णधार रोहित पौडेल (5) आणि कुशल मल्ला (2) यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. याशिवाय गुलशन झाने 35 चेंडूत 23 धावांची खेळी केली. दीपेंद्र अरी (29) याने खालच्या फळीत उपयुक्त योगदान दिले. शेवटी सोमपालने शानदार खेळी करत संघाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली.

आसिफ शेखचे 88 चेंडूत अर्धशतक

नेपाळचा सलामीवीर आसिफ शेखने वनडे कारकिर्दीतील दहावे अर्धशतक झळकावले. त्याने 97 चेंडूत 59.79 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा केल्या. आसिफने सुरुवातीपासूनच संयमी खेळी केली आणि त्याने 88 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या ओव्हरमध्ये मिळालेल्या जीवदानाचा त्याने पुरेपुर फायदा उचलला. त्याच्या खात्यात आता 43 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.25 च्या सरासरीने आणि 76.55 च्या स्ट्राइक रेटने 1,250 धावा जमा झाल्या आहेत. यादरम्यान, त्याने 1 शतकही केले आहे.

जडेजाची शानदार गोलंदाजी

जडेजाने 10 षटकात 40 धावा देत 3 बळी घेतले. कुलदीप यादवला आज एकही विकेट घेता आली नाही. त्याने 10 षटकात 34 धावा दिल्या. शार्दुल ठाकूरने 4 षटकात 26 धावा देत 1 बळी घेतला. हार्दिकने 8 षटकात 34 धावा देत 1 यश मिळवले. शमीच्या खात्यात 1 विकेटही जमा झाली. सिराजने 9.2 षटकात 61 धावा देत 3 बळी घेतले.

श्रेयस, विराट आणि ईशानने सोपे झेल सोडले

भारताने 5 षटकात 3 सोपे झेल सोडले. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने पहिल्या स्लिपमध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने शॉर्ट कव्हर्समध्ये, तर पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक इशान किशनने झेल सोडला. ईशान आणि श्रेयसने कुशल भुर्तेलला तर विराटने आसिफ शेखला जीवदान दिले.

भारताचा खेळाडू जसप्रीत बुमराह, जो आपल्या मुलाच्या जन्मासाठी घरी गेला आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, नेपाळच्या संघातील भीम शार्कीच्या जागी आरिफ शेख खेळणार आहे.

भारताचा संघ : रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

नेपाळचा संघ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (क), भीम शार्की, कुशल मल्ला, सोमपाल कामी, दीपेंद्र सिंग ऐरी, गुलशन झा, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news