Ashes 2023 : ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज हेझलवूड अ‍ॅशेससाठी उपलब्ध

Ashes 2023 : ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज हेझलवूड अ‍ॅशेससाठी उपलब्ध

एजबस्टन; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हेझलवूडने आपण अ‍ॅशेससाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले असून, या मालिकेतील किमान 3 कसोटी सामन्यांत खेळण्याची आपल्याला संधी मिळेल, असा त्याला विश्वास वाटतो. 32 वर्षीय हेझलवूडला अलीकडे सातत्याने दुखापतीचा सामना करावा लागत असून मागील 15 महिन्यांत त्याला केवळ 2 दोन कसोटी सामने खेळता आले आहेत. ऑस्ट्रेलियाने ओव्हलवर भारताला नमवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली, त्या लढतीतही हेझलवूडला खेळता आले नव्हते. (Ashes 2023)

दरम्यान, हेझलवूड उपलब्ध झाल्याने ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनासमोर आता निवडीचा पेच असणार आहे. स्कॉट बोलँड, मिशेल स्टार्क व हेझलवूड यांच्यापैकी दोनच गोलंदाजांना संधी मिळणार असल्याने एका खेळाडूला बेंच स्ट्रेंथवर बसून राहावे लागेल, हे निश्चित आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाची धुरा पॅट कमिन्सकडे असणार आहे. (Ashes 2023)

वास्तविक, हेझलवूडनेही यापूर्वी भारताविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळणे आपल्यासाठी आव्हानात्मक ठरले असते, असे कबूल केले होते आणि आताही अ‍ॅशेस मालिकेत सर्वही 5 कसोटी सामने खेळता येणार नाहीत, याची त्याला पूर्ण कल्पना आहे.

हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी विचारला असता तर मी पाच नव्हे तर सहा कसोटी सामने खेळेन, असे म्हटले असते; पण आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. मागील दोन वर्षांत बरेच बदल झाले आहेत आणि माझ्या तंदुरुस्तीचा स्तर पाहता मी या मालिकेत तीन ते चार सामने खेळण्याचा प्रयत्न करेन. यापेक्षा कमी सामने खेळता आले तर मात्र माझी निराशा होईल, असे हेझलवूड एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. अ‍ॅशेस मालिकेत किती सामने खेळता येतील, असे एका पत्रकाराने त्याला यावेळी विचारले होते.

यापूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये बोलँड ऑस्ट्रेलियाचा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला होता. साहजिकच, एजबस्टनमधील पहिल्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात त्याचे स्थान अबाधित राहील, अशी शक्यता आहे. हेझलवूडला मात्र बोलँडच्या फॉर्ममुळे आपल्याला धोका आहे, असे वाटत नाही. 'माझी कोणाशीही स्पर्धा असत नाही. सामना झाल्यानंतरच कामगिरीचे पुनरावलोकन करणे योग्य ठरते. बोलँड व गोलंदाजी अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्यामुळे मला आणखी अधिक काळ खेळत राहता येईल', असा विश्वास त्याने येथे व्यक्त केला.

'काही सामने खेळता आले नाहीत तर त्यात फारसे चिंतेचे कारण असत नाही. थोडीफार विश्रांती घेऊन पुन्हा ताजेतवाने होऊन मैदानात उतरता येते. आमचा संघ मध्यंतरी जवळपास 20 ते 30 कसोटी सामन्यात एकही अष्टपैलू उपलब्ध नसताना खेळला होता. अगदी चार ते पाच उत्तम जलद गोलंदाज असतील तरीही बरेच काही घडवून आणता येते', असे हेझलवूड शेवटी म्हणाला.

अ‍ॅशेस मालिकेची रूपरेषा

  • पहिली कसोटी : 16 ते 20 जून/एजबस्टन
  • दुसरी कसोटी : 28 जून ते 2 जुलै/लॉर्डस्
  • तिसरी कसोटी : 6 ते 10 जुलै/लीडस
  • चौथी कसोटी : 19 ते 23 जुलै /मँचेस्टर
  • पाचवी कसोटी : 27 ते 31 जुलै/ओव्हल

हेही वाचा;

logo
Pudhari News
pudhari.news