नागपूर : पोलिस आयुक्तांचा ‘कानमंत्र’, ६० लाखांचे दागिने जप्त

नागपूर : पोलिस आयुक्तांचा ‘कानमंत्र’, ६० लाखांचे दागिने जप्त

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: सराफ व्यापाऱ्याचे ६० लाखांचे दागिने लुटल्याची घटना शनिवारी येथील पाचपावलीच्या पुलावर घडली होती.  सराफ व्‍यावसायिक केतन बटूकभाई कामदार यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत, पोटात चाकूचे वार करुन चाेरट्यांनी ६० लाखांचे दागिने लुटले हाेते. या प्रकरणाच्‍या तपासावेळी पोलीस आयुक्तांनी आपल्या पथकाला 'कानमंत्र' दिला. त्यामुळे २० तासांतच पोलीस पथकाने ६ लुटारुंच्या मुसक्या आवळून ६० लाखांचे दागिने जप्त केले आहेत. याप्रकरणी ६ आरोपींना अटक करून पोलिसांनी ६० ते ७० लाख रुपये किमतीचे ११०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

जीवघेणा हल्‍ला करुत लुटले हाेते ६० लाखांचे दागिने

याबाबतची माहिती अशी की, नागपूर शहरातील सराफा लाईनमध्ये केतन यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. शनिवारी केतन हे आपल्या दुचाकीने पाचपावली परिसरात सॅम्पल ग्राहकाला दाखवायला गेले होते. सॅम्पल दाखवून परत येताना पाचपावली पुलावर अज्ञात तरुणाने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर दुसऱ्याने त्यांच्यावर चाकुने वार केले. केतन गंभीर जखमी झाले. यानंतर केतन यांच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन लुटारुंनी घटनास्थळावरुन पोबारा केला.  दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटीच्या घटनेने शहरात खळबळजनक माजली हाेती. केतन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तब्‍बल २०० तासांचे सीसीटीव्‍ही फुटेज तपासल्‍यानंतर धागेदाेरे हाती

सराफा व्यापारी केतन कामदार यांना लुटल्यानंतर पोलिसांनी जलद गतीने तपासाला सुरुवात केली. तक्रारदार केतन हे गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळणे शक्य नव्हते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पथकाला सतर्क करत वायरलेसवर आरोपींच्या मुसक्या आवळण्याबाबत कानमंत्र दिला. त्यामुळे ही बाब लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळासह केतन ज्या- ज्या ठिकाणी गेले, अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यावर काम सुरू केले. सुमारे दोनशे तासांची रेकॉर्डिंग तपासल्यानंतर या प्रकरणातील आराेपींच्‍या मुसक्‍या आवळण्‍यात पाेलिसांना यश आले.

तपास पथकाला चार लाखांचे बक्षीस जाहीर

पाचपावली पुलावर भरदिवसा सराफ व्यापाऱ्याला लुटून लुटारुंनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले हाेते. दिवसाढवळ्या लुटीची घटना घडल्याने सराफ व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली हाेती.  पोलीस पथकाने लुटारुंच्या २० तासात मुसक्या आवळल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोहिमेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news