Opposition Patna Meet | भाजपविरोधी विरोधी पक्षांनी बांधली मोट; एकत्र येत केले शक्तीप्रदर्शन

Opposition Patna Meet
Opposition Patna Meet

पुढारी ऑनलाईन : केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात आज (23जून) विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बिहारमधील पाटणा येथे एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या हितासाठी काम करत नाहीत, तर ते देशाचा इतिहास बदलत आहेत. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक आम्ही सर्व विरोधी पक्ष मिळून एकत्र लढू,(Opposition Patna Meet) असे मत पाटणा बैठकीचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले आहे.

विरोधी पक्षांची पुढची रणनीती ठरवण्यासाठी लवकरच पुढची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे असणार आहे, अशी माहिती देखील नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर दिली. देशभरातील १५ प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Opposition Patna Meet)

या परिषदेत बोलताना पुढे नितीश कुमार म्हणाले, बिहारमधील पाटणा येथे आज (२३ जून) १५ विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये विरोधी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाली. पुढच्या महत्वाच्या विषयांवर पुढच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार असून, आम्ही सर्व पक्ष एकत्र येत निवडणूक लढू. निवडणूक लढवण्यासाठी किमान समान कार्यक्रम १० ते १२ जुलै दरम्यान शिमला येथे होणाऱ्या बैठकीत ठरवला जाईल. या बैठकीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे असणार आहेत, असेही पाटणातील बैठकीचे प्रमुख नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दीपांकर भट्टाचार्य, ओमर अब्दुल्ला, शरद पवार, उद्धव ठाकरे, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती, डी. राजा आणि अन्य नेते उपस्थित होते.

Opposition Patna Meet | कोण काय म्हटले-

मतभेद मागे ठेवून पुढे जाऊ-अध्यक्ष शरद पवार

विरोधी पक्षांमध्ये असलेले मतभेद सोडून आम्ही सर्वजण एकत्र मिळून लढू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

मी देशाची लोकशाही मूल्यांवर हल्ला करणाऱ्याविरोधात – उद्धव ठाकरे

मी स्वतःला विरोधी पक्ष मानत नाही. मात्र, जो कोणी देशाच्या लोकशाही मूल्यांवर हल्ला करेल आणि हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही सर्वजण विरोध करू," असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच पाटणा बैठकीची चांगली सुरुवात झाली आहे. जेव्हा जे काही चांगले सुरू होते तेव्हा सर्वकाही चांगले होते, असेही ठाकरे म्हणाले.

जुलैमध्ये शिमल्यात पुन्हा भेटू-मल्लिकार्जुन खरगे

लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये भाजपशी लढण्यासाठी आपापल्या राज्यांमध्ये काम करताना एकत्र कसे पुढे जायचे याचा अजेंडा तयार करण्यासाठी आम्ही जुलैमध्ये शिमल्यात पुन्हा भेटत आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पटना येथे विरोधकांच्या बैठकीत सांगितले.

विरोधी पक्ष लवचिकतेने एकत्र काम करतील-राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, सध्या भारताच्या पायावरच हल्ला होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष लवचिकतेने एकत्र काम करतील आणि समान वैचारिक मूल्यांचे रक्षण करतील, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

भगवान हनुमानाने कर्नाटकात भाजपला गदा मारून राहुलला विजयी केले: लालू यादव

विरोधकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव म्हणाले, भगवान हनुमान विरोधकांसोबत होते. म्हणून भगवान हनुमानाने कर्नाटकात भाजपला गदा मारली आणि राहुलला विजयी केले. आगामी निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल हे निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

ही एका इतिहासाची महत्त्वपूर्ण सुरुवात -ममता बॅनर्जी

पाटणामधून अनेक जनआंदोलनाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे ही देखील आणखी एका इतिहासाची महत्त्वपूर्ण सुरुवात आहे. विरोधी नेते 2024 च्या निवडणुका एकत्र लढतील. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर देशात कोणतीही निवडणूक होणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

ही लढाई सत्तेसाठी नसून मूल्ये आणि विचारसरणीसाठी-उमर अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, प्रत्येक समविचारी पक्ष या बैठकीत सहभागी झाला आहे. त्यामुळे हे सत्तेसाठी नसून मूल्य आणि विचारसरणीचा लढा आहे, असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मांडले आहे.

जे जम्मू काश्मीरमध्ये व्हायचे तेच आज देशात – मेहबुबा मुफ्ती

जे जम्मू-काश्मीरमध्ये व्हायचे तेच देशभर घडत आहे. गांधींचा देश आम्ही गोडसेचा देश होऊ देणार नाही. गांधींच्या देशासाठी आम्ही हातमिळवणी केली. आमची एकजूट हे नितीश यांचे मोठे यश आहे, असेही  पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी पक्षाच्या अध्यक्ष मुफ्ती म्हणाल्या.

प्रजासत्ताक गमावण्याआधी पुन्हा हक्क मिळवणे आवश्यक- डी.राजा

प्रजासत्ताक गमवण्याआधी ते पुन्हा मिळवणे आवश्यक आहे. प्रजासत्ताक वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी एकमत केले आहे. आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव झाला पाहिजे, असे आमचे मत आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी.राजा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news