पुढारी ऑनलाईन डेस्क : वाघबकरी या प्रसिद्ध चहाच्या ब्रँडचे संचालक पराग देसाई यांचे सोमवारी निधन झाले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करताना ते पडले होते आणि त्यातून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. मेंदूत रक्तस्राव झाल्याने उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स या कंपनीच्या विस्तारात त्यांचा मोलाचा वाटा होता. देसाई यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहेत. तर अनेक प्राणीप्रेमींनी देसाई स्वतःच प्राणीप्रेमी होते आणि त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी मोठी मदत केली होती, ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.
१५ ऑक्टोबरला देसाई यांच्यावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. स्वतःचा बचाव करताना ते पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार त्यांच्या घराबाहेरच घडला.
स्थानिक प्रशासन या घटनेनंतर काही कृती करणार आहे का, असा प्रश्न नागरिक सोशल मीडियावर विचारत आहेत. तर देसाई हे स्वतःच प्राणीप्रेमी होते असे हेल्पिंग हूक्स या संस्थेने म्हटले आहे. या संस्थेच्या प्रमुख अॅनी ठाकूर म्हणतात, "वाघबकरी या कंपनीच्या वतीने जीवदया या ट्रस्टला भटक्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी दोन व्हॅन भेट देण्यात आल्या होत्या." देसाई यांनी भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या जीवदया या संस्थेला नेहमी सहकार्य केले होते. ठाकूर म्हणतात, "देसाई स्वतः प्राणीप्रेमी होते. त्यांच्या निधनाबद्दल आम्हालाही दुःख झाले आहे. पण या घटनेचा वापर प्राण्यांबद्दल तिरस्कार पसरवण्यासाठी होऊ नये."
देसाई यांच्या मागे बायको विदिशा आणि मुलगी परिशा आहेत. देसाई यांचे शिक्षण परदेशात झाले. या कंपनीचे बाजारमूल्य १५०० कोटी इतके आहे. देसाई यांनी नवनवीन उत्पादने लाँच करून कंपनीला नव्या उंचीवर नेले होते.
हेही वाचा