पुढारी ऑनलाईन : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत अनिल यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. (Anil Antony join BJP)
बीबीसीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यानंतर काॅंग्रेसकडून त्याचे समर्थन करण्यात आले होते. मात्र अनिल अँटनी यांनी त्यावरून काॅंग्रेला सुनावले होते तर दुसरीकडे बीबीसीवर आगपाखड केली होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांनी काँग्रेसला रामराम केला होता. अनिल अँटनी यांचा भाजप प्रवेश काॅंग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे.
अनिल अँटनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वादग्रस्त बीबीसी डॉक्युमेंटरीला विरोध करत काँग्रेसच्या भूमिकेवर नापसंती दाखवली होती. त्यावेळी राहुल गांधी यांच्यावरदेखील अनिल यांनी टीका केली होती. जानेवारी दरम्यान केरळचे माजी मुख्यमंत्री ए.के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर आज भाजपच्या ४४ व्या स्थापनादिनीच अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात उपस्थित राहत, मंत्री एके अँटनी यांच्या मुलगा अनिल अँटनी यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे, अशी माहिती पीयूष गोयल यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे.
अनिल अँटनी यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी @incindia @INCKerala मधील माझ्या भूमिकेचा राजीनामा दिला आहे. भाषण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांकडून एक ट्विट मागे घेण्यासाठी सांगणे ही असहिष्णुता आहे, म्हणूनच मी ट्विट मागे घेण्यास नकार दिला. जे प्रेमाच्या वाटेचे समर्थन करत आहेत, त्याच्याच फेसबुक वॉलवरून अपशब्द आणि द्वेष पाहायला मिळत आहेत." असेही अनिल अँटनी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.