Y S Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाची फेररचना, २५ मंत्री शपथबद्ध, मंत्रिमंडळ विस्तारात साधली जातीय समीकरणे

Y S Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाची फेररचना, २५ मंत्री शपथबद्ध, मंत्रिमंडळ विस्तारात साधली जातीय समीकरणे

अमरावती; पुढारी ऑनलाईन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी (Y S Jagan Mohan Reddy) यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची फेररचना केली. त्यात १३ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर त्यांच्या पहिल्या टीममधील ११ जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. ज्येष्ठ आमदार धर्मना प्रसाद राव यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रड्डी यांनी मागील आठवड्यात अचानक मोठा निर्णय घेत अख्खं मंत्रिमंडळच बरखास्त केले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत सर्व २४ मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दरम्यान, त्यांनी मंत्रिमंडळाची फेररचना करत आज (दि.११) पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात जुन्यांसह नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

जगनमोहन रेड्डी (Y S Jagan Mohan Reddy) यांच्या नेतृत्त्वाखालील वायएसआर काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. आता त्यांनी २०२४ मधील निवडणुकीची आतापासून तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करत त्यातून जातीय समीकरणे साधली आहेत.

आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे राज्य सचिवालयाजवळील सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांनी मंत्रिमंडळाच्या २५ सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विधान परिषदेतील कोणालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. जातीचे समीकरण डोळ्यासमोर ठेवून नवीन मंत्रिमंडळ तयार करण्यात आले आहे. मागासवर्गीय समाजातून येणाऱ्यांना मंत्रिमंडळात अधिक प्राध्यान्य दिल्याचे दिसते. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह दोन अल्पसंख्याक समुदायातील, पाच अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतील प्रतिनिधीत्व करणारे सदस्य आहेत. मंत्रिमंडळात चार महिलांचा समावेश आहे. मागील मंत्रिमंडळात प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेल्या कम्मा, क्षत्रिय आणि वैश्य समाजाला आता मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. ब्राह्मण समाजाला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले आले.

राज्यातील एकूण २६ जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यांना नवीन मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मागील मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले अमजत बाशा शेख बेपारी आणि के नारायण स्वामी यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news