मुंबईत अलिशान क्रूझवर ड्रग्जप्रकरणी केलेली कारवाई वादग्रस्त ठरत असून त्यात सहभागी झालेले मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे दोघे 'इंटरेस्टेड विटनेस' असल्याचे मत विधिज्ञ व्यक्त करत आहेत. सरकारी यंत्रणा छापा टाकत असताना यंत्रणेबाहेरी व्यक्तीला साक्षीदार म्हणून नेत असतात. मात्र, एनसीबीच्या कारवाईत हे साक्षीदार विशिष्ट हेतूने आल्याचे सिद्ध होत असल्याचे मत विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
एनसीबीने २ ऑक्टोंबर रोजी एका क्रूझवर कारवाई केली. त्यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन, अरबाज मर्चंट, मूनमून धमेचा यांच्यासहीत अन्य संशयितांना अटक केली. या कारवाईचा व्हिडिओ आणि क्रूझमधील आतील फुटेज व्हायरल झाले होते.
या कारवाईवेळी मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे संशयिना पकडून गाडीत बसवितानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. मनीष भानुशाली हा भाजपचा सक्रीय कार्यकर्ता असून हा छापा म्हणजे रचलेला बनाव आहे, असा थेट आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर एनसीबीचे उप महानिदेशक(उत्तर) ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मनीष भानुशाली आणि किरण गोसावी यांना कायद्यानुसार या कारवाईत सहभागी करून घेतले असा खुलासा केला होता.
तर मनीष भानुशाली याने माध्यमांना मुलाखत देताना प्रथम मी केवळ एनसीबीला माहिती दिली. 'मी कारवाईत सहभाग घेतला नाही,' असे सांगितले. तसेच मी व्हिडिओत कसा आलो हेच माहीत नाही, असे सांगितले. एकूण या प्रकरणात गोंधळ वाढत असून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
चला तर मग जाणून घेऊ अशा पद्धतीने खासगी व्यक्तींना कारवाईत सहभागी करून घेता येते का? कायदा काय सांगतो….
या प्रकाराबाबत ॲड. असीम सरोदे यांच्याशी पुढारी ऑनलाईन ने संवाद साधला असता ते म्हणाले, पुण्यात जेव्हा ड्रग्ज रॅकेटला पकडण्यासाठी विश्वास नांगरे- पाटील यांनी कारवाई केली होती. या छाप्यावेळी त्यांनी मला साक्षीदार होण्याची विनंती केली होती. त्यानुसार मी त्या रेव्ह पार्टीवरील कारवाईवेळी पोलिसांसोबत गेलो होतो.
वकील असूनही मी साक्षीदार म्हणून सोबत गेलो होतो. साक्षीदार म्हणून इतकीच भूमिका असते की, तेथे ज्या काही घटना-घडामोडी घडत असतात त्या त्रयस्थपणे पाहणे, मला पोलिसांनी बोलवले, माझ्यासमोर त्यांनी छापा टाकला, त्यावेळी अमूक घटना घडत होती, अमूक वस्तू होत्या, तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी अमूक कपडे घातले होते. ते ड्रग्ज सेवन करत होते अथवा नाही हे साक्षीदार म्हणून लिहून देणे.'
ते पुढे म्हणाले, 'मुंबईतील क्रूझवरील छापा प्रकरणात आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज याला पकडून नेणे हे काही साक्षीदाराचे काम नाही. असे करणे हे 'इटरेस्टेड विटनेस' असल्याचे सिद्ध होते. इंटरेस्टेट विटनेस ही कायद्यात एक संकल्पना आहे. ते स्वत: साक्षीदार नसतात पण साक्षीदारापेक्षा जास्त काही करून सहभाग नोंदवतात. विशिष्ट गोष्ट विशिष्ट दिशेने घडली पाहिजे असा त्यांना रस असतो.
ते साक्षीदार चुकीचे असतात म्हणून त्यांना इंटरेस्टेड विटनेस असे कायद्यात म्हटले जाते. त्यांचा सहभाग हा विवादास्पद आणि कायदेशीरदृष्ट्या कमजोर असतो. साक्षीदार म्हणून त्यांचा दृष्टिकोन कलुषित असतो. मूकपणे कारवाई पाहणे आणि पोलिसांना तसे लिहून देणे हे साक्षीदाराचे काम असते. कारवाईवेळी पकडलेल्या संशयितांची गचांडी धरून पकडून नेणे, त्याला गाडीत बसवणे हे साक्षीदाराचे काम नाही.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे बायस इन्विस्टिगेशन म्हणचे पूर्वग्रहदूषित, कलुषित तपास सुरू असल्याचे समोर येते. साक्षीदाराच्या भूमिकेच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काहीतरी करण्याचा हेतू दिसतो, हे विशिष्ट हेतूने प्रेरित झाल्यासारखे दिसते. हे प्रकरण जेव्हा जामिनासाठी सुनावणीला समोर येईल तेव्हा एनसीबी काय उत्तर देते हे पहावे लागेल. ही कारवाई कशी राजकीय हेतूने प्रेरित आहे हेही कोर्टात दाखवता येणे शक्य आहे.'