Mob Lynching : करणीच्या संशयातून जमावाने केला वृद्धेचा खून

Mob Lynching : करणीच्या संशयातून जमावाने केला वृद्धेचा खून

पुढारी ऑनलाईन डेस्क: जादूटोणा, करणी, भूतपिशाच्च अशा अंधश्रद्‍देतून आजही अनेकांना पछाडले आहे.  यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच गंभीर गुन्हे घडल्याचे प्रकार समोर आले (Mob Lynching)  आहेत. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जनजागृती केली जात असली तरी हे प्रकार आजही समाजात घडत असल्याने ती एक जटील समस्या बनली आहे.असाच एक धक्कादायक प्रकार झारखंडमधील गढवा जिल्ह्यात (Mob Lynching)घडला आहे.

जादूटोणा आणि करणी करण्याच्या संशयातून एका ७० वर्षीय वृद्धेला घरातून ओढत नागरिकांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी गढवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुरी गावातील एक वृद्धा जादूटोणा आणि करणी करत असल्याचा संशय नागरिकांना होता. यातून रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ५ लोक त्या वृद्धेच्या घरात घुसले. आणि तिला घरातून बाहेर ओढत २०० मीटरपर्यंत फरफटत नेले. तेथे त्या लोकांनी वृद्धेला काठीने बेदम मारहाण केली. यावेळी ती वृद्धा मारेकऱ्यांना दयेची याचना करत  मारहाण करू नका म्हणून विनवणी करत होती. परंतु निष्ठूर मारेकऱ्यांनी बेदम मारहाण चालूच ठेवली. अखेर काठीच्या जोरदार प्रहारामुळे ती वृद्धा गतप्राण झाली.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जादूटोणा, करणीच्या संशयातून हत्या होण्याचे प्रमाण झारखंडमध्ये वाढले आहे. ही एक सामाजिक समस्या बनली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार २००१ ते २०२० या कालावधीत जादूटोणा आणि करणीच्या संशयातून एकूण ५९० जणांची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचलंत का ?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news