मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आपल्या भक्तांनी मनोभावे केलेली सेवा व पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्वीकारून गणराय आपल्या गावी निघाले. शुक्रवारी सकाळपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तीचा महासागर उसळला होता. शनिवारी पहाटे 6 वाजेपर्यंत नैसर्गिक तलावासह कृत्रिम तलावामध्ये 37 हजार 513 बाप्पांचे विसर्जन झाले. यात 6 हजार 343 सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश होता.
मुंबईतील सर्व उपनगरातील गिरगाव, दादर, माहीम, खार, जुहू, सात बंगला, वेसावे, गोराई, आधी चौपट्यांसह पवई अन्य नैसर्गिक तलाव व कृत्रिम तलावात सकाळी 6 वाजेपर्यंत दहा दिवसांच्या 37,513 गणेश मूर्तींचे व 308 गौरींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, सार्वजनिक 6 हजार 343 सार्वजनिक गणेश मूर्तींचा व 31 हजार 170 घरगुती गणेश मूर्तींचा समावेश आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळी 5 हजार 548 सार्वजनिक गणेश मूर्तीं व 22 हजार 297 घरगुती मूर्तीं अशा 27 हजार 845 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच 226 गौरीचे विसर्जन झाले. कृत्रिम तलावात 795 सार्वजनिक गणेश मूर्तीं व 8 हजार 873 घरगुती मूर्तीं अशा 9 हजार 668 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तसेच 82 गौरीचे विसर्जन झाले.