अमरावती : सभेच्या मैदानावरून रवि राणा- बच्चू कडू आमने सामने
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अमरावती लोकसभा मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला निवडणूक होत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना एका सभेच्या मैदानावरून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. खरेतर महायुतीचे घटक असताना राणा, कडू वाद गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा याच मैदानावर होणार असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. तर बच्चू कडू यांच्या उमेदवाराची प्रचार सभा देखील याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कडू आणि राणा एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी पूर्वीच हे मैदान आरक्षित केले असून त्यांच मैदानावर राणा यांनी ताबा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
मात्र रवी राणा यांच्याकडे परवानगी नसताना अमित शहा यांच्या सभेसाठी राणांनी सभा मंडप उभारला आहे. तर आज प्रशासनाने आम्हाला मैदान खाली करून द्यावे. अन्यथा 1 लाख शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे.
दरम्यान, हा मंडप उभारण्यासाठी मला रवी राणा यांनी सांगितले आहे. 300 बाय 600 स्केअर फुटांचा मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 25 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रवी राणा यांनी ज्यांना मंडप डेकोरेशनचे काम दिले त्या राजेंद्र महाजन या डेकोरेशनच्या संचालकाने दिली.
हेही वाचा