कर्मचारी कपातीनंतर Amazon चा मोठा निर्णय, भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद

कर्मचारी कपातीनंतर Amazon चा मोठा निर्णय, भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद

बंगळूर : पुढारी ऑनलाईन; ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज ॲमेझॉन इंडियाने पुढील वर्षी त्यांची एडटेक शाखा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी आता त्यांचा फूड डिलिव्हरी व्यवसायही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲमेझॉनने त्यांच्या रेस्टॉरंट पार्टनर्संना सांगितले आहे की त्यांनी मे २०२० मध्ये सुरू केलेली फूड डिलिव्हरी सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.

ॲमेझॉनने मे २०२० मध्ये Amazon Food सेवा लाँच केली होती. आता ही सेवा बंद केली जाणार आहे. एक दिवसापूर्वीच कंपनीने भारतात लाँच केलेले एडटेक यूनिट बंद करण्याची घोषणा केली होती. ॲमेझॉनने जगभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरु केली आहे. आता त्यांनी त्यांचे काही व्यवसायही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Amazon ने त्यांच्या रेस्टॉरंट पार्टनर्संना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, "या निर्णयाचा अर्थ असा आहे की या तारखेनंतर तुम्हाला ॲमेझॉन फूडद्वारे ग्राहकांकडून ऑर्डर मिळणार नाहीत. तोपर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळत राहतील आणि आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही ग्राहकांच्या ऑर्डरची पूर्तता करत राहाल,". या ईमेलची एक प्रत मनीकंट्रोलला मिळाली आहे.

Amazon ने रेस्टॉरंट त्यांच्या रेस्टॉरंट पार्टनर्संना त्याची सर्व पेमेंट्स आणि इतर कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. रेस्टॉरंट्सकडे ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व Amazon टूल्स आणि रिपोर्ट्सचा ॲक्सेस असेल. जर काही अडचण आल्यास तर ते आगामी वर्षातील ३१ मार्चपर्यंत आवश्यक तो सपोर्ट देतील, असेही पुढे नमूद केले आहे.

Amazon ने त्यांची सेवा बंद केली जात असल्याबद्दल म्हटले आहे की आम्ही वार्षिक ऑपरेटिंग रिव्ह्यू प्रोसेसनंतर Amazon Food सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. जी बंगळूरमध्ये आम्ही प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली होती. इतर सेवांबाबत कंपनीने सांगितले की, "आम्ही भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहोत आणि किराणा, स्मार्टफोन आणि कंन्झूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि सौंदर्य, तसेच Amazon व्यवसायासारख्या B2B ऑफरिंग्जमध्ये गुंतवणूक करणे कायम ठेवू."

Amazon ने गुरुवारी भारतातील त्यांची ऑनलाइन लर्निंग व्हर्टिकल Amazon Academy बंदची घोषणा केली. २०२१ च्या सुरुवातीस कोरोना महामारीच्या काळात एडटेक शाखा सुरु केली होती. हा प्लॅटफॉर्म 'टेस्ट प्रीप' सेगमेंटमध्ये कार्यरत होता आणि IIT-JEE आणि NEET सह प्रवेश परीक्षांसाठी व्हर्च्युअल कोचिंग ऑफर करत होता.

"ॲमेझॉन ॲकॅडमीचे कामकाज टप्प्याटप्प्याने बंद करेल. याची सुरुवात ऑगस्ट २०२३ पासून होईल. जेव्हा आमची विद्यमान बॅच चाचणी तयारीचे मॉड्यूल पूर्ण करेल. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांना खात्री देऊ इच्छितो की या निर्णयाचा आमच्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही," असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news