Manoj Jarange-Patil: मराठा समाजाला मिळाला आश्वासक चेहरा: सर्वपक्षीयांतून मनोज जरांगेंना समर्थन

मनोज जरांगे-पाटील
मनोज जरांगे-पाटील


सेलु, राज्यातील मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण व त्यानंतर संवाद यात्रेच्या माध्यमातून सभांचे आयोजन केले. यासाठी त्यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी गर्दीचा उच्चांक मोडला. मात्र, मराठा आरक्षण व मनोज जरांगे- पाटील यांचे आंदोलन याविषयी तालुक्यातील प्रमुख व्यक्तींच्या प्रतिक्रिया 'दै. पुढारी'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. (Manoj Jarange-Patil)

 मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे – आमदार मेघना बोर्डीकर

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या रास्त मागणीसाठी स्वतः चा संसार, मुलबाळं याचा विचार न करता केवळ समाजासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून एकच मिशन ते म्हणजे मराठा आरक्षण, या ध्येयाने प्रेरित होऊन जरांगे पाटील काम करत आहेत. याचा सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली. (Manoj Jarange-Patil)

Manoj Jarange-Patil : आरक्षण मिळणे ही काळाची गरज – राम नाना पाटील

यापूर्वीही लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. या मोर्चामध्ये योग्य दिशा दाखवणारा प्रमुख चेहरा नव्हता. परंतु आता मनोज जरांगे- पाटील यांच्या पुढाकाराने मराठा समाजाच्या तरुणांना निश्चित योग्य दिशा मिळेल. समाजाला मराठा कुणबी या प्रवर्गामध्ये घेण्याकरिता शासनाला निर्णय पारीत करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते राम नाना पाटील यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारने मर्यादा वाढवून आरक्षण द्यावे – मिलिंद सावंत

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. तसेच आरक्षण केंद्र सरकारने मराठा समाजाला द्यावे, राज्य सरकार व केंद्र सरकार एकाच पक्षाचे असल्याने असे करण्यास अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

आरक्षण मिळणार याचा पूर्ण विश्वास- डॉ. उमेश देशमुख

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ते घालवले. मनोज पाटील – जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल, हा पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राज्य कार्यकारिणी मंडळाचे सदस्य डॉ. उमेश देशमुख यांनी व्यक्त केली.

आरक्षण लढा निर्णायक टप्प्यावर – मिनाक्षी गायकवाड

गेल्या 25-30 वर्षांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजास दिलेलं आरक्षण, स्वातंत्र्यानंतर निजामाच्या काळातील मराठ्यांच्या कुणबी म्हणून असणाऱ्या नोंदी, विदर्भ-खानदेशातील मराठा हा कुणबी असल्याने ओबीसी प्रवर्गात असणारा त्यांचा समावेश आणि बापट आयोग, गायकवाड आयोग यांचा अहवाल या सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यास मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील मराठा कुणबीच असून सामाजिक व शैक्षणिक दृष्टीने मागाससुद्धा आहे. त्यामुळे मनोज जरांगे- पाटील यांनी उभे केलेले आंदोलन संविधानिक दृष्ट्या योग्य असल्याची प्रतिक्रिया मिनाक्षी रामराव गायकवाड यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news