Manoj Jarange-Patil: सिंदखेडराजा येथे मनोज जरांगे-पाटील जिजाऊंच्या चरणी नतमस्तक | पुढारी

Manoj Jarange-Patil: सिंदखेडराजा येथे मनोज जरांगे-पाटील जिजाऊंच्या चरणी नतमस्तक

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ जन्मस्थळाचे मनोज जरांगे- पाटील यांनी आज ( दि.१०) दर्शन घेतले. तत्पूर्वी शिवाजीनगर टी पॉइंट ते राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. राजवाड्यांमध्ये प्रवेश करताच महिलांनी त्यांचे औक्षण केले. तत्पूर्वी फटाक्यांच्या आतिषबाजीने जरांगे यांचे सिंदखेडराजा शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. (Manoj Jarange-Patil)

मनोज जरांगे – पाटील म्हणाले की, शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देऊन माँ जिजाऊंनी बळ दिले होते. आता त्यांच्या दर्शनाने ऊर्जा मिळाली. मराठा बांधवांसाठी आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आरक्षण ही कुणाची मक्तेदारी नाही, ही सुविधा आहे, जो समाज मागासलेला आहे, त्याच्यासाठी आरक्षण दिले आहे. त्यामध्ये मराठा समाज आहे, सरकार कोणाचेही असो आंदोलनकर्ते या नात्याने विश्वास ठेवावाच लागतो, सरकारला आरक्षण द्यायचे नसते, तर त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाच नसता, असे ते म्हणाले. पाच हजार पानांचा पुरावा शासनाला दिला आहे. (Manoj Jarange-Patil)

महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शासन कायदा पारित करून आरक्षण देणार असल्याचा विश्वास आम्हाला आहे. विदर्भातील आमचे बांधव अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमच्या पाठीशी उभे असल्याचे यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले.

यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्यासह नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. येत्या १४ ऑक्टोबरला अंतरवाली येथे जरांगे – पाटील यांची विराट सभा आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी ते संपर्क दौ-यावर आले होते.

हेही वाचा 

Back to top button