धनत्रयोदशी : जाणून घ्या सोने खरेदीचे विविध पर्याय, नियम आणि अटी All About Gold Investments

धनत्रयोदशी : जाणून घ्या सोने खरेदीचे विविध पर्याय, नियम आणि अटी All About Gold Investments

पुढारी ऑनलाईन – धनत्रयोदशी हा सोने खरेदीसाठीचा सर्वांत चांगला मुहुर्त मानला जातो. सांस्कृतिकदृष्ट्या भारतात सोन्याला अत्यंत महत्त्व आहे. लग्न, सणसमारंभ आणि पूजाविधी यासाठी तसेच गुंतवणूक म्हणून अनेक लोक सोने खरेदी करतात. दागिने, नाणी आणि बुलियन्स हे सोने खरेदीचे पारंपारिक पर्याय आहेत. तर डिजिटल, ETF, सुवर्ण रोखे हे सोने खरेदीचे नवे पर्याय आहेत. या सर्वांच्या खरेदीसाठी काही नियम आहेत, ते आपण या लेखातून जाणून घेऊ. (All About Gold Investments)

१. वस्तू रूपात सोने खरेदीचे नियम (Physical Gold)

दागिने, नाणी आणि बुलियन्समध्ये सोने खरेदी हा सर्वांत प्रचलित अशी पद्धत म्हणता येईल. कोणत्याही सराफ दुकानातून सोने खरेदी करता येते. २ लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी रोख रक्कम देऊन खरेदी करताना पॅन कार्ड आवश्यक असते. व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. असे व्यवहार आयकर विभाग तपासत असते. त्यामुळे सोने खरेदीचे बील जपून ठेवणे आवश्यक आहे.

२. गोल्ड ETF (Gold ETF)

Exchange Traded Funds मध्येही सोन्याची खरेदी करता येते. हे व्यवहार म्युचअल फंडासारखे असतात. अशा प्रकारे सोने खरेदी केली

असेल तर त्यावर फार चांगला परतावा मिळतो. बाजारात प्रचलित दराप्रमाणे ETF घेता येतात. एक ग्रॅम सोन्याचा दर म्हणजे १ युनिट असते. बाजारातील दराप्रमाणे ETF विकता येतात.

ETF कसे घ्याल?

यासाठी तुम्हाला डिमॅट खाते लागेल. तुम्ही खरेदी केलेले ETF यात सुरक्षित राहतील. Kotak Gold ETF, SBI Gold ETF, HDFC Gold ETF आणि IDBI Gold ETF असे काही ETF प्रसिद्ध आहेत.

3. सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bonds)

Sovereign Gold Bonds हे सरकारी रोखे आहेत. ज्या दिवशी आपण रोखे खरेदी करतो, त्या दिवशीच्या सोन्याच्या दरानुसार रोखे वितरित केले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे रोखे जारी करते. रोख्यांच मुदत ८ वर्षांची असते पण ५ वर्षांनंतर रोखे जमा करता येतात. सर्वसाधारण या रोख्यांवर २.५ टक्के वार्षिक व्याजही मिळते. असे रोखे कर्जासाठी तारण म्हणूनही देता येतात. एका आर्थिक वर्षात व्यक्ती आणि अविभाजित हिंदू कुटुंब ४ किलो सोन्याच्या किमती इतके रोखे घेऊ शकतात. तर विभाजित कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ४ किलोपर्यंत सोन्याच्या रकमेपर्यंत हे रोखे घेऊ शकते. असे रोखे संयुक्तरीत्याही घेता येतात. ट्रस्ट आणि कायदेशीर सुवर्ण रोखे घेऊ शकतात.

सुवर्ण रोख्यांसाठी लागणारी कागदपत्रे?

सुवर्ण रोखे खरेदीसाठी पॅन कार्ड, TAN, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र अशी कागदपत्रे लागतात. जर बँकेत आधीच खाते असेल तर तेथून सुवर्ण रोखे घेताना नव्याने KYCची गरज नसते. सर्व सरकारी बँका, पोस्ट खाते, काही खासगी बँकात सुवर्ण रोखे घेता येतात.

४. डिजिटल गोल्ड (Digital Gold)

हा सोने खरेदीचा डिजिटल प्रकार आहे. अशा प्रकारे सोने खरेदी करण्याचे बरेच फायदे आहेत. विशेष म्हणजे कमीत कमी किती सोने डिजिटल पद्धतीने घ्यावे, यावर मर्यादा नाही. त्यामुळे काही प्लॅटफॉर्मवर अगदी १ रुपयात ही डिजिटल सोने घेता येते.

तर जास्तीजास्त

किती सोने घ्यावे, यालाही मर्यादा नसली तरी एका दिवसात फक्त २ लाखापर्यंतची खरेदी करता येते. शिवाय आपण जेव्हा डिजिटल सोने घेतो तेव्हा ते २४ कॅरेटचे असते. Airtel Payment Bank, Paytm, HDFC Securities, G-Pay अशा विविध प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोने खरेदी करता येते.

Augmont Gold Ltd, MMTC-PAMP India Pvt आणि Digital Gold India Pvt/ Ltd या कंपन्या डिजिटल गोल्डचे व्यवहार करतात. त्यांनी विविध पेमेंट प्लॅटफॉर्मसोबत टायअप केलेले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news