नागपूर : पुढारी वृत्तसेवा : जागा वाटपाबाबत तिन्ही पक्ष सकारात्मक आहेत. प्रसंगी दोन पावले मागे जावून एकत्रितपणे लढण्यावर एकमत असल्याचे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. जागा बदल किंवा जागा वाटपाबाबत मात्र, अद्याप चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागपुरात आजपासून राष्ट्रवादीचे ओबीसी चिंतन शिबीर सुरु होत असून या शिबीरासाठी अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नागपुरात आले आहेत. ओडिशातील रेल्वेचा अपघात अतिशय दुदैवी घटना असून अशा घटना घडल्यावर पूर्वी रेल्वेमंत्री राजीनामा देत होते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. रेल्वेने या प्रकरणाची कठोर चौकशी करून दोषींवर कठोर शिक्षा करायला हवी, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी थुंकण्याच्या केलेल्या प्रकारावर विचारले असता अजित पवार म्हणाले की, काही त्रास झाल्याने त्यांनी तसे वक्तव्य केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नेत्यांनी प्रसार माध्यमांपुढे बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. अलिकडे भावनांचा अतिरिक होत असल्याचे दिसते. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्याला आवर घातला पाहिजे, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.
एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, मुंडे आणि खडसे यांचे घरोब्याचे संबंध असून ते संबंध खूप जुने आहेत. त्यामुळे त्यांनी भेटण्यात काहीच गैर नाही, यासोबतच पंकजा मुंढे यांनी काही भावना व्यक्त केली असली तरी तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून यावर दुसऱ्यांनी बोलू नये असे अजितदादा पवार म्हणाले.
यानंतर माजी खासदार बाळू धानोरकर, माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या निधनानंतर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ते रवाना झाले आहेत.
हेही वाचा :