Narendra Modi
Narendra Modi

Narendra Modi :माेदींविराेधात तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात, काेण आहेत अजय राय?

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१४) वाराणसी मतदारसंघातून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपकडून सलग तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून लढत आहेत. तर 'इंडिया' आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. ते तिसऱ्यांदा पंतप्रधानांच्या विरोधात वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. जाणून घेऊया आतापर्यंतची वाराणसी मतदारसंघातील लढती आणि अजय राय यांच्याविषयी…

वाराणसीत पीएम मोदी विरुद्ध अजय राय लढत

  • वाराणसी मतदारसंघासाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवार १ जून रोजी मतदान होत आहे
  • पंतप्रधान मोदी वाराणसी मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा  निवडणूक लढवत आहेत. 
  • काँग्रेसने उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी दिली आहे.  

अजय राय 'मूळ'चे भाजपचे, सपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्‍ये

अजय राय यांनी आपल्‍या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून केली. १९९६ साली अजय राय यांनी कोलासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २००९ मध्‍ये त्‍यांनी भाजपमधून बाहेर पडण्‍याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. मात्र येथे ते फार काळ रमले नाहीत. त्‍यांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी त्‍यांनी वाराणसी मतदारसंघातून अपक्ष म्‍हणूनही निवडणूक लढवली आहे. आता सलग तिसर्‍यांदा ते काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

अजय राय चौथ्यांदा 'लाेकसभा' निवडणूक मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा भाजपकडून वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2014 आणि 2019 मध्ये ते येथून खासदार म्हणून निवडून आले होते. तर यावेळी ते (Narendra Modi) लोकसभेसाठी तिसऱ्यांदा भाजपचे उमेदवार असणार आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय तिसऱ्यांदा पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, परंतु लोकसभेसाठी त्यांची ही चौथी उमेदवारी आहे.

२०१४ मध्ये PM मोदींकडून केजरीवालांचा पराभव

२०१९ च्या लोकसभेवेळी अजय राय हे काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मैदानात होते. परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सपाच्या शालिनी यादव यांचा ४.७९ लाख मतांनी पराभव केला होता. त्याचप्रमाणे 2014 च्या निवडणुकीतही अजय राय काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी वाराणसीतून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा ३.७१ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

२००४ ची लोकसभा काँग्रेसने जिंकली, पण उमेदवार आज भाजपमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यापूर्वी 2009 ची लोकसभा निवडणूक वाराणसी मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी जिंकली होती. 1984 नंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ एकदाच काँग्रेसने वाराणसीची जागा जिंकली होती. यावेळी काँग्रेस उमेदवार राजेश कुमार मिश्रा खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु काँग्रेसचे 2004 चे उमेदवार राजेश मिश्रा आता भाजपमध्ये आहेत. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत फरक असा आहे की, वाराणसी मतदारसंघात काँग्रेसचे अजय राय हे इंडिया आघाडीचे उमेदवार असल्याने त्यांना समाजवादी पक्षाचा देखील पाठिंबा आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news