पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. यावरून राज्यात वादाला तोंड फुटले आहे. आता हा वाद उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला आहे. बनारसमध्ये काही लोकांनी अजानच्या वेळी लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसाचे पठण सुरू केले आहे. श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती चळवळीच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंग यांनी याची सुरुवात आपल्या घरापासून केली आहे. त्यांनी छतावर अनेक लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण सुरू केले आहे.
बनारसच्या साकेत नगर भागातील रहिवासी असलेले सुधीरसिंग काही सहकाऱ्यांसोबत टेरेसवर उभे राहून लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसाचे पठण करतात. त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सकाळी लाऊडस्पीकरवरील अजानमुळे लोकांची झोप उडते आणि त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी हे केले जात आहे. आम्हाला हिंदू-मुस्लिम ऐक्य हवे आहे, असेही ते म्हणाले.
आधी आम्ही झोपेतून उठायचो, मग त्या वेळी मानस मंदिर आणि इतर मंदिरात वेद पाठ व्हायचे, हनुमान चालिसाचे पठण व्हायचे; पण दबावामुळे या सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मशिदीवरील अजानच्या आवाजामुळे पहाटे साडेचार वाजता झोप उडते. जेव्हा लाऊडस्पीकरवर अजान सुरू झाल्यास वैदिक मंत्र आणि हनुमान चालीसा सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीर सिंग पुढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही, अजान करा; पण आवाज कमी होऊ द्या. ध्वनीप्रदूषण कमी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. पुरेशी झोप व्हायला हवी. झोप झाली नाही तर लोकांना किती त्रास होतो, हे त्यांना सांगणेही महत्त्वाचे आहे. आम्हीही हळू आवाजात हनुमान चालिसा पठण करू, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर लाऊडस्पीकरवरून अजानच्या निषेधार्थ हनुमान चालिसाचे पठण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आता ही मोहीम उत्तर प्रदेशात सुरू झाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का ?