नगर : पुढारी वृत्तसेवा
नगर शहरात पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. साधारण 21 धोकादायक इमारती असून, त्यातील सहा इमारती पाडण्यासाठी पंधरा दिवसांत विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी घर मालकांना नोटिसा व निवेदन प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
पावसाळ्याच्या तोंडावर शहरात कोणतीही दुर्घना घडू नये, म्हणून महापालिकेकडून जुन्या इमारतींची पाहणी केली जाते. इमारत मोडकळीस आली असल्यास ती घर मालकाने स्वतः पाडून घ्यावी आणि जीवितहानी टाळावी, अशा सूचना नागरिकांना दिल्या जातात. मात्र, लक्षात कोण घेतो अशी परिस्थिती मनपाची आहे.
इमारती धोकादायक असल्याबाबत मनपाकडे 126 तक्रारी आल्या आहेत. त्यातील 21 इमारती धोकादायक असून, त्यातील 4 इमारती यापूर्वी उतरून घेण्यात आल्या आहेत. तर, सहा इमारतींचा न्यायालयीन वाद सुरू आहे. अन्य 12 इमारती पाडण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. साधारण सहा इमारतींबाबत मालक – भाडेकरू अथवा कोणताही वाद नसल्याने त्या इमारती पाडण्यासाठी पंधरा दिवसांत सुरुवात करण्यात येणार आहे.
शहरात सहा धोकादायक इमारतींबाबत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. त्या इमारती येत्या पंधरा दिवसांत विशेष मोहीम राबवून उतरवून घेण्यात येणार आहेत.
– सुरेश इथापे, शहर अभियंता
धोकादाय इमारतीच्या तक्रारी-126
धोकादायक इमारती – 21
धोकादायक इमारती पाडल्या – 4
इमारती धोकदायक असल्याची तक्रार आल्यानंतरही संबंधित मालक मनपाला कागदपत्रे देत नाहीत. अनेक इमारतीमध्ये मूळ मालक राहत नाहीत. त्यांनी ती इमारत भाडेकरारावर दुसर्याला दिलेली असते. महापालिकेचे पथक इमारत पाडण्यासाठी गेल्यानंतर भाडेकरू घर खाली करीत नाही आणि मालक लक्ष देत नाही. त्यामुळे अशा अनेक इमारती वर्षानुवर्षे उभ्या आहेत.
जुन्या शहरातच धोकादायक इमारती
नगर शहरात सर्व धोकादायक इमारती जुन्या शहरात आहेत. सावेडी, बोल्हेगाव, केडगाव, मुकुंदनगर, सावेडी उपनगर आदी भागात धोकादायक इमारती नाहीत. कारण त्या अलीकडच्या काळातील इमारती आहेत. मात्र, जुन्या शहरात अनेक दुमजली इमारती असून, त्या धोकादायक आहेत.
https://youtu.be/m5yyfqkYqY4