कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा – टिपू सुलतानचा स्टेटस ठेवल्या प्रकरणी कसबा बावडा येथील भगव्या चौकात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शिवसेना ठाकरे गटासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलन केले. जिहादी प्रवृत्तीच्या लोकांच्यामुळे कोल्हापूर शहराची अस्मिता बिघडत आहे, संबंधितांना अटक करा, आठ दिवसांत पोलिसांनी संबंधिताला अटक करून कारवाई नाही केली तर शिवसेना संबंधिताच्या घरासमोर आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.
संबंधित बातम्या –
सकाळी अकरा वाजल्यापासून भगवा चौक परिसरात आंदोलनाच्या निमित्ताने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे आंदोलन करू नये, राज्यभर वेगळा संदेश जाईल, अशी विनंती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी आंदोलकांना केली. कार्यकारी दंडाधिकारी विजय जाधव, कसबा बावडा तलाठी दीपक मंगसुळकर उपस्थित होते.
कसबा बावड्यातील भगवा चौकात समस्त हिंदूंनी जनजागृतीसाठी आणि प्रशासनास जाग आणाण्यासाठी आंदोलन करत असल्याचे पत्रक दिले होते. शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पोलीस प्रशासनाला हे पत्रक दिले होते. टिपु सुलतानचे स्टेटस लावत असतील, औरंगजेबाच्या नावाने आलमगीर घोषणा देत असतील तर अशांचां निषेध करुन पोलीस प्रशासनाला जाग आणणे आणि राज्य सरकारला या गोष्टी कळवणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. असे म्हणत दुपारी साडेबाराच्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मारला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतले, यावेळी घोषणांनी परिसर दणाणला.