नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी लष्कराने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, आमचा आमच्या सुरक्षा दलांवर विश्वास आहे, पण भाजप सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही. सरकार म्हणते की त्यांच्याकडे सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ आहे, मग दिग्विजय सिंह यांनी सरकारला ते दाखवायला सांगितले त्यात गैर काय? आम्ही पुरावे मागत नाही, पण सरकारने आपल्या दाव्यांचा व्हिडिओ दाखवावा, अशी मागणी राशीद अल्वी यांनी केली आहे.
यापूर्वी २३ जानेवारी रोजी दिग्विजय सिंह यांनी 'सर्जिकल स्ट्राईक'वर प्रश्न उपस्थित केला होता. जम्मू-काश्मीरमधील भारत जोडो यात्रेदरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना सिंह यांनी CRPF जवानांना श्रीनगरहून दिल्लीला विमानाने नेले जात असल्याचा आरोप केला होता. सैन्य पाठवण्याची विनंती सरकारने मान्य केली नाही आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवानांनी आपले प्राण दिले.
ते 'सर्जिकल स्ट्राईक'ची चर्चा करतात, ते अनेकांना मारण्याचे बोलतात, पण पुरावा देत नाहीत. ते खोट्या गोष्टींचा आधार घेत, राज्य करत आहेत. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. पक्षाची कोंडी होत असल्याचे पाहून, काँग्रेसने दिग्विजय यांच्या वक्तव्यापासून दूर राहून हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.