पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Elections 2024 )रणधुमाळी सुरु झाली आहे. पक्ष राष्ट्रीय असो की प्रादेशिक उमेदवारी मिळवण्यासाठीही इच्छूक प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडत आहेच. असेच काहीसे तामिळनाडूतील मारूमालार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) खासदार ए गणेशमूर्ती ( Erode MP A Ganeshamoorthy ) यांच्या बाबतीत झाले. पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले. यामुळे निराश झालेल्या गणेशमूर्ती टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
गणेशमूर्ती यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, आज सकाळी गणेशमूर्ती यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या होऊ लागल्या. कीटकनाशक प्राशन केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना तत्काळ इरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोईम्बतूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
एमडीएमके'चे सरचिटणीस वायको यांनी रविवारी रात्री रुग्णालयात जावून गणेशमूर्तींची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, इरोड मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दुरई वायको यांचे नाव सुचवले. मात्र मी तत्काळ त्याला संमती दिली नाही. आम्ही मतदान घेतले. 99% कार्यकर्त्यांनी दुराई वायको यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार झाला. यानंतर गणेशमूर्ती यांनी टोकाचे पाऊल उचलले.
गणेशमूर्ती हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि आमदार म्हणूनही काम केले आहे.
हेही वाचा :