दीड महिन्यानंतर फ्लॉवरचे दर वाढले ; शेतकर्‍यांमध्ये समाधान

दीड महिन्यानंतर फ्लॉवरचे दर वाढले ; शेतकर्‍यांमध्ये समाधान

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  दीड महिन्यापूर्वी फ्लॉवरला बाजारात 10 किलोंसाठी 60 ते 100 रुपये बाजारभाव होता. परंतु, आता फ्लॉवरच्या दरात वाढ झाली आहे. प्रतवारीनुसार प्रति 10 किलोंसाठी 160 ते 200 रुपये बाजारभाव फ्लॉवरला मिळू लागला आहे. त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब, चांडोली, पारगाव शिंगवे, निरगुडसर, नांदूर, टाकेवाडी, घोडेगाव, अवसरी आदी गावांमध्ये फ्लॉवरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. साधारण 45 ते 60 दिवसांत फ्लॉवर विक्रीयोग्य होतो.

फ्लॉवरला खत, औषधे, मजुरी असा सुमारे 40 ते 50 हजार रुपये एकरी खर्च येतो. परंतु गेल्या दीड महिन्यात फ्लॉवरचे बाजार भाव 10 किलोंसाठी प्रतवारीनुसार 60 ते 100 रुपयांपर्यंत उतरले होते. त्यामुळे फ्लॉवर काढणीदेखील शेतकर्‍यांना परवडत नव्हती. अनेक शेतकर्‍यांनी फ्लॉवर पिकात जनावरे चरण्यास सोडली होती. परंतु गेल्या 15 दिवसांपासून फ्लॉवरला चांगला बाजारभाव मिळू लागला आहे. मात्र, खराब हवामानामुळे फ्लॉवरचे नुकसान झाल्याने उत्पादन घटले आहे, अशी माहिती कळंब येथे फ्लॉवर उत्पादक शेतकरी सचिन कानडे आणि अमित भालेराव यांनी दिली. सध्या बाजारात फ्लॉवरला प्रतिकिलोसाठी 18 ते 20 रुपये बाजारभाव मिळत आहे. मॉलमध्ये मात्र 20 ते 25 रुपये किलोने विक्री होत आहे. त्यासाठी फ्लॉवरची प्रतवारी चांगली असली पाहिजे, असे कळंबच्या सरपंच उषा कानडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news