घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही: आदित्य ठाकरे

आदित्‍य ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )
आदित्‍य ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

मुंबई: पुढारी वृत्तसेवा :  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योगमंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही, हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा, पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत देखील भाष्य केले.

या वेळी आदित्‍य ठाकरे म्‍हणाले, "विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर यांच्यासह आम्ही सर्वांनी नाशिक, पुणे दौरा केला. शेतकऱ्यांची भेट घेतली, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही अधिवेशनात पायऱ्यांवर आंदोलन करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली. मात्र सरकारने ऐकलं नाही. अजूनही शेतात पाणी आहे. कुठलाही मंत्री शेतात गेलेला नाही. आताच्या घडीला शेतकऱ्यांसोबत उभं राहायला हवं."

एका बाजूला शेतकरी संकटात असताना उद्योग जगतात देखील आपल्याला धक्के बसत आहेत. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क सारखे मोठे प्रकल्प बाहेर गेले असताना आता टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. उद्योगमंत्री यांनी एक मुलाखतीत सांगितलं होतं की, मिहानसोबत एअरबस प्रकल्प नागपूरला येणार. चुकीची माहिती का दिली? चार मोठे प्रकल्प बाहेर गेलेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री यांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल ठाकरे यांनी केला.

कुठल्याही उद्योजकांना या घटनाबाह्य सरकरवर विश्वास नाही, हे सरकार किती काळ टिकेल. दिल्लीत या सरकारच्या अस्थिरतेबाबत चर्चा सुरू आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षामुळे गद्दारीमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते. महाराष्ट्राला फटका बसतोय, असेही ते म्‍हणाले.

इतर राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यात उद्योग कसे येतील, याबाबत प्रयत्न करतात. पण आपले मुख्यमंत्री नुसतेच फिरताहेत. कोणी गद्दारी करत असेल, तर त्याला शाल घालताहेत. मी जर यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतो, तर राजीनामा दिला असता आणि सरकारमधून बाहेर पडलो असतो आणि निवडणुकीला सामोरे गेलो असतो, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news