राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान मोदी देणार केवाडियाला भेट, स्वागतासाठी आदिवासी बालकांचा विशेष संगीत वाद्यवृंद सज्ज | पुढारी

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान मोदी देणार केवाडियाला भेट, स्वागतासाठी आदिवासी बालकांचा विशेष संगीत वाद्यवृंद सज्ज

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा -राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवडियाला (गुजरात) भेट देणार आहेत. यावेळी बनासकांठा जिल्ह्यातील अबाजी शहरातील आदिवासी बालकांचा संगीत वाद्यवृंद पंतप्रधानांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान त्यांना आदरांजली वाहणार आहेत. एकता दिनानिमित्त आयोजित संचलनातही पंतप्रधान सहभागी होणार असून, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये विविध नागरी सेवांशी संबंधित अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार असल्याचे पीएमओकडून सांगण्यात आले आहे.

पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्याची ही या वाद्यवृंदाची पहिलीच वेळ नाही. ३० सप्टेंबर २०२२ रोजी, पंतप्रधानांनी गुजरातमध्ये अंबाजी येथे भेट दिली होती. या वेळी ७२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले होते. त्यावेळी आयोजित समारंभासाठी पंतप्रधानांचे आगमन होत असताना या वाद्यवृंदाने त्यांचे स्वागत केले होते. यावेळी या युवा वाद्यवृंदाचे पंतप्रधानांनी कौतुक केले होते आणि त्यांच्या सादरीकरणाचा आनंदही घेतला होता. इतकेच नाही तर समारंभाला सुरूवात होण्यापूर्वी त्यांनी या वाद्यवृंदाशी वैयक्तिक संवादही साधला होता. आपल्या या युवा मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत छायाचित्रही काढून घेतले होते.

उत्कृष्ट संगीत कौशल्य आत्मसात करणाऱ्या या आदिवासी बालकांची कहाणी जाणून घेण्यासारखी आहे. ही मुले एकेकाळी आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आणि शिक्षणाच्या संधीसाठी संघर्ष करत होती. त्यासाठी अंबाजी मंदिराजवळ पाहुण्यांसमोर भीक मागताना ही मुले सतत दिसत. अंबाजी येथील श्री शक्ती सेवा केंद्र नावाच्या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने या मुलांना मदतीचा हात दिला. त्यांना शिक्षण दिले आणि त्यांची कौशल्येही जाणून घेतली. श्री शक्ती सेवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेने या आदिवासी मुलांना वाद्यवृंदासाठी उपयुक्त असे संगीताचे शिक्षणही दिले आहे

पंतप्रधानांनी या युवा वाद्यवृंदाच्या सादरीकरणाचा आनंद घेतला,त्यांचे कौतुक केले आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी या वाद्यवृंदाला केवडिया येथे आमंत्रितही केले आहे, जेणेकरून त्यांनाही या ऐतिहासिक दिवशी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन सादरीकरण करता येईल.

हेही वाचा : 

 

Back to top button