नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जावी, अशी विनंती भांडवली बाजाराचे नियंत्रण करणाऱ्या सेबी संस्थेने केली आहे. या मागणीला विरोध करीत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग संस्था हिंडेनबर्गने अदानी उद्योगसमुहावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशाच्या उद्योग जगतात खळबळ उडाली होती. तर अदानी समुहाच्या कारभाराच्या सखोल चौकशीचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीच्या अनेक याचिका दाखल झाल्या होत्या.
आरोपांच्या अनुषंगाने तपास करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जावी, अशी विनंती सेबीने अलीकडेच केली होती. सेबीच्या या विनंतीला एका याचिकाकर्त्याने विरोध केला आहे. अदानी समुहाने समभागांच्या किंमती कृत्रिमपणे वाढविल्याचा तसेच नियामक माहिती जाहीर करण्यात अनियमितता झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला आहे.
गत मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सेबीला दोन महिन्यांच्या आत तपास पूर्ण करावा, असे निर्देश दिले होते. गुंतवणुकदारांच्या हितरक्षणासाठी एका समितीची स्थापना करण्याचे आदेशही त्यावेळी न्यायालयाने दिले होते.