अंजली आणि अमित यांचे ‘असा ये ना…’ हे नवे गुलाबी गाणं भेटीला

अंजली आणि अमित यांचे ‘असा ये ना…’ हे नवे गुलाबी गाणं भेटीला

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री अंजली नान्नजकर आणि अभिनेता अमित डोलावत या नव्या जोडीची चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारं 'असा ये ना…' हे नवे गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गुलाबी गाण्यात प्रेक्षकांना एका छोट्याशा हळूवार प्रेमकथेचाही अनुभव घेता येणार आहे.

धरणी प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मात्या सुनीता नायक यांनी 'असा ये ना…' या गाण्याची निर्मिती केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी मोहन नामदेव राठोड यांनी सांभाळली आहे. 'असा ये ना…' हे गाणं गीतकार कौतुक शिरोडकर यांनी लिहिलं असून रोहित राऊत आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या सुमधूर आवाजात सुप्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'असा ये ना…' या सुमधूर गाण्यात रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची अफलातून केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे.

या गाण्याच्या निमित्तानं अभिनेत्री अंजली नान्नजकर आणि अभिनेता अमित डोलावत यांना एकाच फ्रेममध्ये आणण्याची किमया दिग्दर्शक मोहन राठोड यांनी साधली आहे. या गाण्यात प्रेमाचा एक वेगळाच रंग रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या गाण्यात राठोड यांनी एका शूरवीर सैनिकाची लव्हस्टोरी सादर केली आहे. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकाच्या स्वप्नातील हे गाणं आहे.

या सैनिकाची पत्नी घरी आहे. पती सीमेवर देशाच्या रक्षणाची, तर पत्नी घरी संसार सांभाळण्याची जबाबदारी चोख बजावत असताना ते मनांच्या माध्यमातून दोघे एकत्र येतात आणि त्यातून हे गाणं तयार होतं. या गाण्याचं शूटिंग सातारा येथे करण्यात आलं आहे. धरणी प्रोडक्शन बॅनरखाली या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याच्या निर्मात्या सुनीता नायक या अहमदाबादच्या रहिवासी आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news