स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’, पुण्यात राष्ट्रवादीने टू व्हीलरला लावले स्टिकर | पुढारी

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’, पुण्यात राष्ट्रवादीने टू व्हीलरला लावले स्टिकर

पुणे; पुढारी ऑनलाईन : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षकच होते असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केले होते. या विधानावरून अजित पवार यांच्या विरोधात भाजपसह अनेक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवारांविरोधात राज्यभर निदर्षने देखील केली जात आहेत.

आता याला पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शुक्रवार ६ जानेवारी रोजी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसमवेत दुचाकींना ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ अशा पद्धतीचे स्टिकर लावले आहेत. या दुचाकी शहरात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेत, तर स्वराज्यरक्षकच आहेत, असे वक्तव्य विधानसभेत केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पडदा टाकला. आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत म्हणत आपण शरद पवारांच्या भूमिकेशीही सहमत असल्याचे सांगत भाजपला शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला.त्यानंतर दोन दिवसांनी भाजपने आकाशपाताळ एक करत राज्यभर आंदोलन सुरू केले होते. युवराज संभाजीराजे भोसले यांनी अजित पवार यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाला आणखी धार चढली होती. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मला भाजपच्या अनेक नेत्यांचे फोन

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मला भाजपचे कित्येक मंत्री, नेते, खासदारांचे फोन आले. ते मला म्हणाले की, दादा आम्हा सर्वांना सांगितले आहे की, तुमच्याविरोधात जोरदार आंदोलन करा, तुमच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा मागा, चुकीचे बोलल्याबद्दल. परंतु आता आम्हालाही कळत नाही की, तुम्ही नक्की काय चुकीचे बोलला. आम्हाला आंदोलनाचा काय पॅटर्न असला पाहिजे हेही सांगितले आहे. आम्ही कसे आंदोलन करायचे. कोणता फोटो वापरायचा. पुन्हा या आंदोलनाचे फोटो काढून ऑफिसला पाठवायचे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Back to top button