जतच्या पाणी प्रश्नावर तुकाराम बाबा महाराजांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

जतच्या पाणी प्रश्नावर तुकाराम बाबा महाराजांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
Published on
Updated on

जत; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी बुधवारी (दि. ३०) रात्री उशिरा भेट घेतली. पाऊण तासाच्या भेटीत तुकाराम बाबा यांनी मुख्यमंत्र्यांना जत तालुक्यातील 'त्या' आठ तलावात म्हैसाळच्या मुख्य कालव्यातून कमी खर्चात सायफन पद्धतीने पाणी जाऊ शकते, हे नकाशासह पटवून सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही तुकाराम बाबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. या मागणी संदर्भात जलसंपदा विभाग व प्रशासनाला सूचना देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जत तालुका संपर्कप्रमुख योगेश जानकर उपस्थित होते.

दुष्काळी जत तालुक्याला पाणी देता की कर्नाटकात पाठवता, दुष्काळी जत तालुक्याला पाणी द्या, जत तालुक्यातील आठ गावांना म्हैसाळच्या मुख्य कालव्यातून, मायथळ येथून पाणी जावू शकते त्याला तात्काळ मान्यता द्या या मागणीसाठी तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ, गुड्डापूर, संख, सोर्डी, सिद्धनाथ, शेडयाळ, दरीबडची, दरीकोनूर या आठ तलावातील पाणी एकत्र केले आणि मंगळवारी सकाळी या आठही तलावातील एकत्र केलेले पाणी एका कलशात घेवून जत तहसिल कार्यालय गाठले. तहसिलदार जीवन बनसोडे यांना निवेदन दिल्यानंतर तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली असलेले शिष्यमंडळ सांगली येथे रवाना झाले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांनी कलशासह निघालेल्या शिष्टमंडळाला अडविल्याने पोलीस व शिष्टमंडळ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. जिल्हाधिकारी यांना भेटल्याशिवाय जाणार नसल्याचा पवित्रा शिष्टमंडळाने घेतला अखेर जिल्हाधिकारी यांची भेट झाली.

सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर तुकाराम बाबा यांच्यासह शिष्टमंडळाने कृष्णा नदी गाठत कृष्णेचे पाणी कलशात घेवून मुंबईला रवाना झाले व त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तुकाराम बाबा यांच्यात पाऊण तासाहून अधिक वेळ सकारात्मक चर्चा झाली. जतमधील मायथळ येथील म्हैसाळ मुख्य कालव्यातून व्हसपेठ, गुडडापूर, संख तलावात, अचकनहळळी येथील कालव्यातून सोर्डी, कोळगिरी, शेडयाळ येथील कालव्यातून शेडयाळ, दरीकोनूर, दरीबडची तलावात सायपन पद्धतीने आपल्या हक्काच्या म्हैसाळ योजनेतून पाणी देता येते हे तुकाराम बाबा यांनी नकाशासह मुख्यमंत्र्यांना दाखवले. या आठ तलावात कशा पद्धतीने पाणी जाऊ शकते याचा प्लॅनच तुकाराम बाबा यांनी मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिला.

मुख्यमंत्र्यी यांनी तुकाराम बाबा यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. कमी खर्चात व वेळेत या आठ तलावात म्हैसाळचे पाणी जावू शकते, तेव्हा या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी यांना सर्व्हेबाबत सूचना देवू. या कामासाठी आपण माझ्याकडे केव्हाही बिनधास्त या, जतला पाणी मिळाले पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

या योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी पाऊण तासाहून अधिक वेळ देत शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले व आठ तलावात पाणी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेवू ,अशी ग्वाही दिल्याबद्दल तुकाराम बाबा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news