पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाकडून सोमवारी (दि.२७) देशाच्या विविध भागात जोरदार निदर्शने करण्यात आली. राजकीय सूडापोटी तपास संस्थांचा गैरवापर करीत सिसोदिया यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला आहे.
दिल्लीबरोबरच चंदीगड, मुंबई, भोपाळ आदी शहरांत सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. राजधानी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न 'आप' कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी भाजप मुख्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी निमलष्करी दलाचे सैनिक तैनात करण्यात आले होते. दीनदयाळ मार्गावर भाजपचे मुख्यालय आहे, मुख्यालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडस लावण्यात आले होते. यावेळी 'आप' कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सिसोदिया यांच्या अटकेविरोधात सीबीआय कार्यालयाबाहेर आक्रमक झालेल्या खा. संजय सिंग, केजरीवाल मंत्रिमंडळातील मंत्री गोपाल राय व अन्य ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती. पक्षाच्या ८० टक्के नेत्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप 'आप' कडून करण्यात आला आहे. दरम्यान सीबीआयचे बहुतांश अधिकारी सिसोदिया यांना अटक करण्याच्या विरोधात होते, मात्र वरुन आदेश असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांतदेखील सिसोदिया यांच्या अटकेविरोधात निदर्शने झाली आहेत.
हे वाचलंत का?