पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना सुरुच आहे. आता अमेरिकेतील आयोवा राज्यातील एका हायस्कूलमध्ये गुरुवारी झालेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर पाचजण जखमी झाले. हिवाळ्यातील सुट्टीनंतर पहिल्या दिवशी वर्ग पुन्हा सुरू होण्यापूर्वी एका १७ वर्षीय मुलाने आयोवा शहरातील हायस्कूलमध्ये गोळीबार केला. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. (US shooting)
आयोवा डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी डिव्हिजन ऑफ क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचे साहाय्यक संचालक मिच मोर्टवेड यांच्या म्हणण्यानुसार, संशयित शूटर हा हायस्कूलचा एक विद्यार्थी असून त्याने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले. तो मृतावस्थेत सापडला आहे.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३७ वाजता गोळीबाराची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित शूटर हा १७ वर्षीय आहे. तो मृतावस्थेत सापडला आहे. त्याच्याकडे पंप-अॅक्शन शॉटगन आणि लहान-कॅलिबर हँडगन सापडली आहे.
या घटनेत सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, असे मोर्टवेड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींमध्ये पेरी हायस्कूलचे मुख्याध्यापक डॅन मारबर्गर यांचाही समावेश आहे. पेरी कम्युनिटी स्कूल बोर्ड आणि ईस्टन व्हॅली स्कूल डिस्ट्रिक्टने याची पुष्टी केली आहे. एकाची प्रकृती गंभीर आहे, तर इतर चार जणांची प्रकृती स्थिर आहे, असे मोर्टवेड यांनी सांगितले.
संशयिताने केलेल्या गोळीबाराचे नेमके काय कारण होते? याचा तपास केला जात आहे. तसेच अधिकारी गोळीबारावेळी त्याने केलेल्या "अनेक सोशल मीडिया पोस्ट्स" चा शोध घेतला जात आहे, असे मोर्टवेड म्हणाले.
गुरुवारच्या गोळीबाराच्या घटनेच्या काही वेळापूर्वी संशयिताने पेरी हायस्कूलच्या बाथरूममध्ये जाऊन टिकटॉकवर एक फोटो पोस्ट केला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने फोटोला "now we wait" असे कॅप्शन दिले होते आणि KMFDM या जर्मन बँडचे "स्ट्रे बुलेट" हे गाणे त्याच्यासोबत जोडले होते. तपासकर्त्यांना संशयित मुलाने बंदुकांसह पोझ दिलेले फोटोदेखील सापडले आहेत. (US shooting)
हे ही वाचा :