पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्यांना 25 लाखांचे रोख बक्षीस जाहिर केले आहे. तसेच त्याच्या 'डी' गँगमधील साथीदारांची माहिती दिल्यास त्यांनाही बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा एनआयएने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एएनआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बोलताना सांगितले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आपल्या साथिदारांना सोबत घेऊन डी-गँग स्थापन केली आहे. त्याने शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटांच्या (FICN) तस्करीसाठी एक युनिट तयार केले आले आहे. तसेच पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ले घडवण्याची योजनाही आखली जात आहे.
दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ हाजी अनीस, त्याचे जवळचे सहकारी जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, शकील शेख उर्फ छोटा शकील आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ टायगर मेमन या सहकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांनाही एएनआयने बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमसाठी ही 25 लाख, छोटा शकीलसाठी २० लाख आणि अनीस, चिकना आणि मेमनसाठी प्रत्येकी 15 लाख रूपयांचे बक्षीस एएनआयने जाहीर केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.