टीईटी घोटाळ्यातील बोगस शिक्षकांबाबतचा अहवाल होणार सादर

TET scam
TET scam

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यासंदर्भातील संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्याबाबत शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होईल,' अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. टीईटी परीक्षा 2019 ची तब्बल सात हजार 880 जणांना बनावट पध्दतीने प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले असून, त्याबाबतची यादी पत्त्यांसह तयार झाली आहे. संख्या मोठी असल्याने दोषानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा संस्थापक गणेशन ट्रान्झिट रिमांड घेऊन पोलिसांसमोर हजर झाला असून, त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

2019 ची शिक्षक पात्रता परीक्षा 2020 मध्ये पार पडली. या परीक्षेच्या निकालात 16 हजार पैकी सात हजार 880 परीक्षार्थींना बनावटरीत्या पास केल्याचे उघड झाले आहे. अंतिम निकालाची फेरतपासणी केली असता त्यात बोगस परीक्षार्थी यादी टाकल्याचे दिसून आले. आरोपींनी तीन प्रकारे गैरव्यवहार केला असून, पहिल्या प्रकारात ओएमआर शीटमध्येच बदल केला. दुसर्‍या प्रकारात ओएमआर शीट स्कॅन झाल्यानंतर निकाल बदलण्यात आला, तर काही परीक्षार्थींचा जातीचा रकाना बदलून त्यांना पास करण्यात आले. जर तीन प्रकारांत बसले नाही त्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली असून, अशाप्रकारे आरोपींनी मोठा गैरव्यवहार केला आहे.

300 बोगस प्रमाणपत्रांची माहिती पोलिसांकडे टीईटी प्रमाणपत्र प्रत्यक्ष देणे आवश्यक असताना काही परीक्षार्थींना ते पोस्टाद्वारे किंवा कुरिअरने पाठविले गेले असून, याबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक जिल्ह्याकडून मागविण्यात आली आहे. आतापर्यंत चार ते पाच जिल्ह्यांतील 300 बोगस प्रमाणपत्रांची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. सर्व माहिती गोळा करून राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांसोबत पडताळणी करीन त्यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.

आरोग्य विभाग पेपरफुटीप्रकरणी शिक्षक अटकेत

आरोग्य विभागाच्या गट 'ड' पेपर फुटीप्रकरणात अर्जुन भरत बमनावत उर्फ राजपूत या शारीरिक शिक्षण देणार्‍या शिक्षकाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अर्जुन याने यापूर्वी अटक केलेल्या संदीप भूतेकर याच्याकडून परीक्षेपूर्वी प्राप्त केलेला पेपर पुढे किती परीक्षार्थींना पाठविला आहे, त्याचा तपास करणे आवश्यक आहे. आरोपीने बर्‍याच विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे प्राप्त करून घेतली असल्याची शक्यता आहे. आरोपीने किती विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना गट 'ड' या संवर्गाचा पेपर दिला आहे, याचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news