राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनात उपोषण करणाऱ्या एका आंदोलनकर्त्याला मंगळवारी (दिनांक ३१) पोलिस व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे राजगुरूनगर येथे गेले महिनाभर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. त्यात चार जण बेमुदत उपोषण करीत आहेत.यातील अजय गंगाधर स्वामी यांची प्रकृती मंगळवारी सकाळी खालावली. अशक्तपणा व ताप आल्याने आरोग्य अधिकारी डॉ महेश दहीवाल यांनी तपासणी केली.
त्यात रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.त्यानंतर काही वेळात रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पोलिस व आरोग्य अधिकारी तसेच उपस्थित आंदोलकांनी स्वामी यांना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. त्यानंतर चांडोली ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, अजय स्वामी व विकास ठाकूर हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करीत आहेत. विकास ठाकूर यांना दोन दिवसांपासून अशक्तपणा जाणवत आहे, असे अंकुश राक्षे यांनी सांगितले.
हेही वाचा :