Pakistan blast | पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 40 ठार, 200 हून अधिक जखमी

Pakistan blast | पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 40 ठार, 200 हून अधिक जखमी
Published on
Updated on

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या (Pakistan blast) खैबर पख्तुनख्वा राज्यातील बाजौरमध्ये रविवारी एका राजकीय सभेदरम्यान भीषण बॉम्ब स्फोट होऊन त्यात 40 जण ठार, तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. (Pakistan blast)

सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या जमियत उलेमा इस्लाम फजलची (जेयूआयएफ) सभा बाजौर येथे सुरू होती. या संघटनेचे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला हे सभेत भाषण करणार होते. तथापि, काही कारणास्तव ते सभास्थळी पोहोचू शकले नाहीत. नंतर मीडियाशी संवाद साधताना हाफिज म्हणाले, या स्फोटात आमचे सुमारे 40 कार्यकर्ते ठार झाले आहेत. मी या घटनेचा निषेध करतो. असे हल्ले यापूर्वीही होत आले आहेत. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्हाला कोणत्याही प्रकारची सुरक्षाही दिली जात नाही. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडणार आहोत.

आत्मघाती हल्ल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 4.30 च्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी सभास्थानी मोठा जमाव जमला होता. पक्षाच्या समर्थकांमध्येच हल्लेखोर उपस्थित होते. त्यामुळे हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे. जेयूआयएफचे ज्येष्ठ नेते मौलाना झिया उल्लाह जान यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा झाला असून जखमींना विविध ठिकाणच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. (Pakistan blast)

या घटनेनंतर जेयूआयएफचे प्रमुख मौलाना फजल यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी संपर्क साधून त्यांना या हल्ल्याविषयी सविस्तर माहिती दिली. सरकारनेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्या मते हा हल्ला म्हणजे देशाला कमकुवत करण्याचे आणखी एक षड्यंत्र आहे. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार कठोर कारवाई करू शकते.

हल्ल्यामागे कोण हे गूढच

जेयूआयएफ ही अत्यंत कट्टर इस्लामी संघटना आहे. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तालिबान्यांशी या संघटनेचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे या भागात तालिबान्यांनी हल्ला केला असण्याची शक्यता कमी आहे. तथापि, तालिबानचा हात या हल्ल्यामागे नसेल तर तो कोणी केला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील चर्चेत जमियतचे प्रमुख मौलाना फजल-उर-रहमान यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, नंतर चर्चा निष्फळ ठरली. (Pakistan blast)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news