माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न : अशोक चव्हाण

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : बनावट पत्र तयार करून मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठवले असून मला संपवणे हाच यामागील हेतू असल्याचे दिसत आहे. असे मत आज (दि.२१) कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. माझ्यावर पाळत ठेवली जात असून माझा विनायक मेटे करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. आणि म्हणूनच, ज्यावेळी मला हे प्रकरण समजले त्याचवेळी मी पोलिसात जाऊन तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले. मराठा आरक्षणाविरुद्ध अशोक चव्हाण यांच्याकडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेल्या पत्राच्या धर्तीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, राजकीय द्वेष, इर्षेतून असे कारनामे सुरु असून अशा घटना पुढे वाढू नयेत म्हणून मी नांदेड पोलीस अधिक्षाकंकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. उलट मराठा आरक्षणासाठी मी विधानसभेत आवाज उठवला आहे, त्याबद्दल पाठपुरवठा केला आहे हे सगळ्यांनी पाहिलं आहे. मला याची भीती आहे की, अशा प्रकारची विविध समाजाच्या विरोधात भाष्य असणारी बनावट पत्रे निर्माण करून लोकांना भडकवण्याचा हा खटाटोप सुरु आहे. हे कारस्थान माझ्या राजकीय विरोधकांचे असून माझ राजकीय करिअर संपवण्यासाठी मोठे कारस्थान सुरु आहे. ज्या परिस्थितीत विनायक मेटेंचे निधन झाले ती परिस्थिती पाहता मला सावध राहण्याचा सल्ला माझ्या जवळच्यांनी दिला आहे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणले, हल्ली जे काही वातावरण देशात, राज्यात चालले आहे ते फारच गढूळ आहे. काही मंडळी राजकीय विरोधक संपवण्यासाठी बसली आहेत. आम्ही अशाप्रकारचे राजकारण कधीच केले नाही. याविरुद्ध कायदेशीर लढावेच लागणार असून त्यासाठी आम्ही तयार आहोत असेही चव्हाण यांनी नमूद केले.

हे वाचलंत का?  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news