सोलापूर : १६ महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार, गळा दाबून खून

सोलापूर : १६ महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार, गळा दाबून खून
Published on
Updated on

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सिकंदराबाद येथे मोलमजुरी करणार्‍या नराधम बापाने आपल्याच सोळा महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिचा गळा आवळून खून केला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राजस्थानला जाणार्‍या बाप तसेच त्याला मदत करणार्‍या आईला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी गुरुवारी (दि. 6) अटक केली. प्रवासात बालिका हालचाल करीत नसल्याने प्रवासी व तिकीट तपासणीसला संशय आल्याने चौकशीत हा प्रकार चव्हाट्यावर आला.

याबाबत सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सुभाष गवळी (वय 41) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे, संबंधित बाप हा मोलमजुरी करतो. त्याने गेल्या 3 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या सोळा महिन्यांच्या मुलीवर राहत्या घरी (रामपल्ली, हैद्राबाद, तेलंगणा) येथे अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार केला. त्यांनतर त्याने तिचा गळा दाबून खून केला.

या प्रकारानंतर त्या नराधमाने बालिकेच्या आईला धमकी देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने पत्नी व चार वर्षांच्या मुलासोबत मुलीचा मृतदेह घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मूळगावी राजस्थान येथे जाण्यासाठी तो निघाला. त्यासाठी ते सर्वजण सिकंदराबाद-राजकोट या रेल्वेने जात होते.

प्रवासात बाप आणि आईने आपली मुलगी ही आजारी असून तिच्या उपचारासाठी मूळ गावी जात असल्याचे रेल्वेतील प्रवाशांना सांगितले होते. रेल्वे प्रवासातील अनेक तासांमध्ये या मुलीची कसलीच हालचाल इतर प्रवाशांना दिसून आली नाही. त्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी वाडी आणि गुलबर्गा या रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीसना हाक दिली होती. परंतु, तिथे प्रवाशांचे कोणीही ऐकले नाही.

अखेर सोलापूर जवळ आल्यानंतर इतर प्रवाशांनी तिकिट तपासणी अधिकार्‍यास याबाबत माहिती दिली. त्यानुसार तिकीट तपासणीसांनी सोलापूर लोहमार्ग पोलिसांना याबाबत कळविले.

सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ हालचाली करून सोलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे आल्यानंतर तेथे संबंधित आई-बापाला अडविले व त्यांची चौकशी केली. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण कसून चौकशीत मुलगी मृत झाल्याचे कबूल केले. त्यामुळे आई-बापाला ताब्यात घेतले. तसेच मयत मुलीचे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनात तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

यामुळे पोलिसांनी बापाकडे कसून चौकशी करता त्याने आपणच मुलीवर अत्याचार केल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी बापाला बलात्कार, खून तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच आईवर आरोपीचा बचाव करण्याच्या उद्देशाने तो गुन्हा दडवून मदत केल्याचा गुन्हा दाखल झाला, त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. हा गुन्हा केसरा पोलीस ठाणे (जिल्हा रंगारेडडी) येथे घडलेला आहे. त्यामुळे संपूर्ण तपासाच्या कागदपत्रासह संशयीत आरोपींना हैद्राबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news