औरंगाबाद : भिलदरी आणि जैतखेडा परिसरात फूलतेय गांजाची शेती | पुढारी

औरंगाबाद : भिलदरी आणि जैतखेडा परिसरात फूलतेय गांजाची शेती

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भिलदरी येथे दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी (दि. १४) रोजी १ लाख ९६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याची घटना ताजी असताना पिशोर ग्रामीण पोलिसांनी बुधवारी जैतखेडा येथे छापा टाकून ४३ हजार रूपयाचा गांजा जप्त केला. या घटनेने खळबळ उडाली असून या परिसरात गांजाची शेती फुलत असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यातील जैतखेडा येथे कपाशीच्या शेतात गांजा असल्याची माहिती पिशोर पोलीस सहाय्यक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिंदे यांनी कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करुन गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राजूसिंग जालम डेडवाल (रा. जैतखेडा) याच्या गट क्रमांक १६३ मध्ये कपाशीच्या शेतात छापा टाकून ४ किलो ६५० ग्रॅम वजन असलेली ४३२८० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली.

पिशोर पोलीस ठाण्यात राजूसिंग डेडवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. सपोनि कोमल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सतीश बडे, ए. एस. आय. सोनाजी तुपे, पो. ना. किरण गंडे, निळकंठ देवरे, सोपान डकले, गजानन कराळे, लालचंद नागलोत, वसंत पाटील, दीपक सोनवणे यांनी ही कारवाई केली. यावेळी नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, तलाठी दीपाली बागुल, पो. पा. दिलीपसिंग महेर यांनी पंचनामा केला. पोलिस उपनिरीक्षक विजय आहेर हे अधिक तपास करीत आहे.

पिशोर पोलीस ठाण्याच्या हड्डीत गांजाची शेती करून विक्री होत आसल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली त्यांच्या कारवाईनंतर पिशोर पोलिस ठाणे खडबडून जागे झाल्याने दूसरी कारवाई करण्यात आली. पिशोर परिसरातील भिलदरी व जैतखेडा हा परिसर डोंगराळ दुर्गम भागात मोडतो. यामुळे शक्यतो याकडे कोणत्याही विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहसा फिरकत नाही.

याचाच फायदा घेत येथील शेतकऱ्यानी अंतर पीक म्हणून जास्त पैसे मिळवण्याच्या नादात गांजाची लागवड केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर हा गांजा लागवड करण्याची कल्पना दिली कोणी? तयार झालेला गांजा कुठे विकला जात होता? यात अजून किती ठिकाणी गांजा लागवड झालेली आहे हे सर्व पोलिस तपास करत आहेत.

कन्नड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंदी असताना ही मोठ्या प्रमाणात अवैध रित्या विक्री सुरु असून आता गांजा या नशेली पदार्थाची भर पडली आहे. गुटखा खाण्यासोबत चिलममधून गांजा ओढून नशा करण्याचे प्रमाण तरुणात वाढत असून पोलिसांकडून यांची पाळेमुळे ऊखडून कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button