मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यानंतरही 8,202 कोटी रुपयांचे चलन अजून बाजारात आहे. एकूण चलनातील 97.69 टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.
संबंधित बातम्या
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या होत्या. मात्र, बाद केलेल्या नोटांच्या बदल्यात बाजारात मोठ्या प्रमाणावर चलन उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली गेली. मात्र, 9 ऑक्टोबर 2023 पासून टपाल कार्यालयाच्या माध्यमातून नोटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयात पाठविता येत आहेत. त्याद्वारे आलेल्या नोटा संबंधितांच्या बँक खात्यांत बदलून दिल्या जातात. पुढील महिन्यात दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून घेतलेल्या निर्णयास एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानंतरही 8 हजार 202 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात आहेत.
गेल्या वर्षी 19 मे रोजी आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. त्या वेळी बाजारात 3.56 लाख कोटी रुपये मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा होत्या.