जय श्रीरामच्या जयघोषात आज पूर्व विदर्भात प्रचारतोफा थंडावणार | पुढारी

जय श्रीरामच्या जयघोषात आज पूर्व विदर्भात प्रचारतोफा थंडावणार

नागपूर : राजेंद्र उट्टलवार

पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होऊ घातले आहे. आज श्रीरामनवमीच्या निमित्ताने सायंकाळी निघणाऱ्या शोभायात्रा, रामनामाचा जयघोष यातच सायंकाळी निवडणूक प्रचारतोफा थंड होणार आहेत. आज सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी गुंतले आहेत. नागपूर श्री पोद्दारेश्वर राम मंदिर पश्चिम नागपूर रामनगर उत्तर नागपुरात डेली शॉप शिव मंदिर अशा तीन मोठ्या शोभायात्रांच्या निमित्ताने सत्तारूढ विरोधक परस्परांस सोबत एकत्रित पाहायला मिळणार आहेत.

मतदार पुन्हा मोदी सरकारला कौल देणार की परिवर्तन घडविणार हे येत्या 4 जून रोजीच स्पष्ट होणार आहे. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा पाच महत्त्वाच्या लढतींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. गेल्यावेळी या पाचही जागा महायुतीच्या ताब्यात असल्या तरी यावेळी काँग्रेसने उमेदवार बदलत, नवे चेहरे पुढे करीत सामाजिक समीकरणातून तगडे आव्हान उभे केल्याचे म्हणता येईल. नागपूर, गडचिरोली, भंडारा या तीन मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार नितीन गडकरी, अशोक नेते आणि सुनील मेंढे यांना मैदानात उतरवले असून चंद्रपूरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तर रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेत रिंगणात उतरलेले राजू पारवे यांची कसोटी लागणार आहे.

विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कापावे लागले आहे. एकीकडे कडक ऊन तर दुसरीकडे सततचा अवकाळी पावसाचा फटका या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक शांत मतदार राजाने अनिश्चित केल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, उदय सामंत, आपचे नेते संजय सिंह अशा अनेक नेत्यांच्या सभांनी प्रचाराची रणधुमाळी रंगली असली तरी आपल्या विवंचनेत गुंतलेला मतदार राजा शांत असल्याने शेवटी हा मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज शेवटच्या दिवसात अधिकाधिक मतदारांपर्यत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार असून, पाठींबा, समर्थन मिळवण्यासाठी पोल मॅनेजर्स कामाला लागले आहेत. उद्या राजकीयदृष्ट्या निवडणूकपूर्व महत्वाची’ कत्तल की रात’ आहे.

हेही वाचा : 

Back to top button