अमेठीतून निवडणूक लढवणार? राहुल गांधी म्‍हणाले, “काँग्रेस अध्‍यक्ष…” | पुढारी

अमेठीतून निवडणूक लढवणार? राहुल गांधी म्‍हणाले, "काँग्रेस अध्‍यक्ष..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्‍ला अशी ओळख असणार्‍या उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढविणार का?  या प्रश्‍नाचे उत्तर राहुल गांधी यांनी आज (दि.१७) दिले. केरळच्या वायनाडमधून काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिलेले राहुल गांधी अमेठीतूनही निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशमध्‍ये आज (दि.१७) अखिलेश यादव यांच्‍याबरोबर संयुक्‍त पत्रकार परिषदेत त्‍यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी राहुल गांधी म्‍हणाले की, “निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समिती ( सीईसी) निर्णय घेते. या निर्णयांचे पालन मी करतो. याबाबत काँग्रेस पक्षाच्‍या केंद्रीय निवडणूक समिती आणि काँग्रेस अध्यक्ष मला जे काही करण्यास सांगतील, मी ते करेन.”

केरळच्या वायनाडमधून काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिलेले राहुल गांधी अमेठीतूनही निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. राहुल गांधी यांनी २००४ पासून सलग तीन वेळा अमेठीची जागा जिंकली आहे. स्‍मृती इराणी यांनी २०१९ मध्ये ५५ हजार मतांनी ही जागा जिंकली होती. यंदाही भाजपने या मतदारसंघातून स्मृती इराणी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने अद्याप त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नहाी

भाजपला १५० जागा मिळणार नाहीत : राहुल गांधी

पंतप्रधान खऱ्या मुद्द्यांवर बोलत नाहीत. लोकशाही नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला देशभरात १५० जागाही मिळणार नाहीत, असा दावा काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी संयुक्‍त पत्रकार परिषदेत केला. यंदाची लोकसभा निवडणूक ही देशभरातील विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे राष्‍ट्रीय स्‍वंयसेवक संघ (आरएसएस) आणि भाजप हे भारतीय राज्‍यघटना आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष भारतीय राज्‍यघटना आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्‍येक निवडणुकीत २-३ मोठे मुद्दे असतात. यंदाच्‍या निवडणुकीत बेरोजगारी आणि महागाई हे अनुक्रमे पहिला आणि दुसरा मोठा मुद्दा आहे; पण भाजप अन्‍यत्र लक्ष वळवण्यात व्यस्त आहे. या महत्त्‍वाच्‍या मुद्द्यांवर पंतप्रधान किंवा भाजप बोलत नाहीत.”
गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी, चुकीचा जीएसटी लागू करून आणि अदानीसारख्या बड्या अब्जाधीशांना पाठिंबा देऊन रोजगार निर्मितीची व्यवस्था कमी केली आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

पंतप्रधानांची मुलाखत स्क्रिप्टेड

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी याची एक मुलाखत प्रसिद्‍ध झाली. ती एक स्क्रिप्टेड मुलाखत होती. तो एक फ्लॉप शो होता. यामध्ये पंतप्रधानांनी इलेक्टोरल बाँड्सचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पारदर्शकता आणि स्वच्छ राजकारणासाठी इलेक्टोरल बॉण्ड्सची व्यवस्था आणला असल्‍याचा दावा त्‍यांनी केला. जर हे खरे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने ती व्यवस्था का रद्द केली आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पारदर्शकता आणायची होती तर भाजपला पैसे देणाऱ्यांची नावे का लपवली. ज्या तारखा त्यांनी तुम्हाला पैसे दिले त्या तारखा का लपवल्या? असे सवाल करत ही जगातील सर्वात मोठी खंडणी वसुली योजना होती, असा आरोप त्‍यांनी केला.

इलेक्टोरल बाँडने त्यांचा पर्दाफाश केला : अखिलेश यादव

यावेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, ‘ लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्‍ये भाजपचा सपशेल पराभव होणार आहे. या पक्षाने आजपर्यंत केवळ आश्‍वासने दिली आहेत. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झालेले नाही. तरुणांना रोजगार मिळालेला नाही. विकासाची आश्वासनेही अपूर्ण आहेत. इलेक्टोरल बाँडने त्यांचा पर्दाफाश केला आहे. भाजप हे भ्रष्टाचाऱ्यांचे कोठार झाले आहे.

 

Back to top button