दीड वर्षांच्या मुलाला बापाने आपटून मारले | पुढारी

दीड वर्षांच्या मुलाला बापाने आपटून मारले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दीड वर्षांच्या मुलाची पित्यानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात घडली. इम्रान अनिस अन्सारी असे या आरोपी पित्याचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आजारी असल्याने इम्रानने त्याचा दीड वर्षांचा मुलगा आफान याची हत्या केल्याने तपासात उघडकीस आले आहे.

सकिना ही महिला तिच्या पती आणि दोन मुलांसोबत मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहते. आफान हा तिचा दीड वर्षांचा मुलगा असून त्याला किडनीचा आजार आहे. त्याच्या आजारामुळे तसेच उपचाराच्या खर्चावरून सकिना आणि इम्रान यांच्यात सतत खटके उडत होते. इम्रानला दारू पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे तो अनेकदा कामावर जात नव्हता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता तो नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करून घरी आला. यावेळी त्याचे क्षुल्लक कारणावरून सकिनासोबत भांडण झाले होते. त्यामुळे तो घरातून निघून गेला आणि साडेसात वाजता पुन्हा घरी आला. त्याने सकिनाकडे जेवण मागितले. त्यामुळे ती त्याला जेवण आणण्यासाठी किचनमध्ये गेली होती. यावेळी त्याने झोपलेल्या आफानला उचलून जमिनीवर जोरात आपटले. हा प्रकार सकिनाच्या लक्षात येताच तिने त्याच्या तावडीतून त्याची सुटका केली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना रात्री उशिरा आफानचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच आरोपी इम्रान अन्सारीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हेही वाचा : 

Back to top button