पिंपळनेर : यंदा गावरान आंब्याची गोडी मिळणे कठीणच; कैरीचाही तुटवडा जाणवणार | पुढारी

पिंपळनेर : यंदा गावरान आंब्याची गोडी मिळणे कठीणच; कैरीचाही तुटवडा जाणवणार

पिंपळनेर, जि.धुळे  : पुढारी वृत्तसेवा
बदलत्या हवामानामुळे यंदा साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील गावरान आंबा खूप कमी प्रमाणात आलेला आहे. अल्प प्रमाणात पडलेली थंडी, अवकाळी पाऊस, वातावरणात सातत्याने होणारे बदल, ढगाळ वातावरण त्यातच किडींचा प्रादुर्भावामुळे गावरान आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे आंबा उत्पादक शेतकरी सांगतात. तसेच मोहरावर तुडतुड्या, भुरी रोगाचा झालेला प्रादुर्भावामुळे मोहर गळून पडला आहे. बऱ्याच आंब्यांना अगदी कमी मोहोर आला आहे. तर काही आंब्याना मोहोर आला परंतु तो ढगाळ वातावरणामुळे गळून पडला आहे.

गावरान आंब्याचे यावर्षी उत्पादन म्हणावे तसे आलेले दिसत नाही. दरवर्षी अक्षय तृतीयेला गावरान आंब्याची चव चाखायला मिळते. लोणच्यासाठीच्या कैरीचाही तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील परिसरात गावरान आंब्याची खूप जुनी झाडे पाहावयास मिळतात. तर विविध प्रकारच्या आंब्याची लागवड करण्यात येते. त्यांना चवीनुसार नावे देण्यात आली आहेत. गावरान आंब्यांना खोबऱ्या, केसर, केळी, कागदी, शेपू, गोटी, शेंद्री, साखरी, बदाम आंबा आदी नावाने ओळखले जाते. इतर जातीच्या आंब्यापेक्षा गावरान जातीच्या आंब्याला मागणी जास्त असते. साधारणपणे अक्षय्य तृतीयेपासूनच बाजारात गावरान आंबे विक्रीसाठी येतात. उत्पादन घटणार असल्याने यंदा आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे गावरान आंब्याची गोडी चाखायला मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: 

Back to top button